रविवार, ३१ मे, २०२०

भैताड

                                                           !!  भैताड !!
                                     
                                          "माझ्या मराठीचा बोलू कवतिके परी अमृताते पैजा जिंके "! ज्ञानदेवांनी कितीतरी शतके आधी मराठीची महती सांगितली आहे, गोडवे गायली  आहे, पण इतक्या वर्षात मराठी भाषेत अनेक बदल हे काळाच्या ओघात झाले आहेत, कुठलेही बदल हे समृद्धीचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे मराठी भाषेतील बदलांनी भाषा समृद्ध करण्याचे काम इतक्या वर्षांनी नक्कीच केले आहे ,काळानुरूप मराठी भाषेमध्ये अनेक शब्द जोडल्या गेले,काही विस्मृतीत गेले,तर काही स्वरूप बदलवून  राहिले. स्वात्यंत्रवीर सावरकरांनी भाषा शुद्धीचा आग्रह धरून इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांना मराठी पर्यायी शब्द देऊन भाषेचे दालन अधिकच समृद्ध केले या विषयी कुठलीच शंका नसावी.
                                           असो, मराठी भाषा हि बोली भाषा म्हणून जरी एक असली तरी तिला भरपूर कंगोरे सुद्धा आहेत,अगदी पुस्तकी नागर भाषा, पुणेरी, बम्बईया , कोकणी ,कोल्हापुरी, खान्देशी,वऱ्हाडी इ. ढोबळमानाने त्याचे अनेक प्रकार करता येतील पण जिल्हा बदलला कि भाषा सुद्धा बदलते,दर मैलागणिक ती बदलत असते  किंवा त्यातील ठराविक शब्द हे त्या प्रांताकरिता ,जिल्ह्याकरिताच मर्यादित असतात .पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात वास्तव्याला गेल्यानंतर तिथल्या मुळ भाषेवर आपली विशिष्ट भाषा शैलीचा प्रभाव टाकण्यात काहीजण नक्कीच यशस्वी होतात व ते स्थानिक भाषा मात्र अधिक सम करण्याचे मह्तकार्य करत असतात.                                                                                
                                    विदर्भ म्हणटल ,कि वऱ्हाडी भाषा असं सर्व साधारण समीकरण !पण वऱ्हाडी भाषा हि मुख्यत्वे वर्धा,अकोला,यवतमाळ,अमरावती बुलढाणा इ. जिल्ह्यात जास्ती बोलल्या जाते.चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा इ. भागातस्थानिक भाषेवर शेजारील जिल्ह्यांचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवतो व स्थानिक भाषेतील शब्दांची सरळमिसळ त्यात झालेली दिसते. पण "नागपुरी"भाषा हि एकदम वेगळी थोडी वऱ्हाडी ,थोडी हिंदी,इथल्याच मूळ असलेल्या "सावजी"इ. भाषेची सरळमिसळ करून बनलेली एक वेगळीच बोली आणि त्यात सामावलेले शब्दही असेच अफलातून !जे कुठेच ऐकायला मिळत नाही .असाच एक वैशिष्टपूर्ण शब्द म्हणजे "भैताड"! तसा "भैताड" शब्द बाकी विदर्भात सुद्धा बह्याड ,भैताड म्हणून सर्रास वापरतात पण नागपूरकरांनी याला फारच अंगा-खांद्यावर खेळवले आहे व अगदी रोजच्या बोलण्यातील एक तो अनिवार्य शब्द झाला आहे. तुला काही समजत नाही,वेडपट ,मूर्ख, बावळट ,पागल या अर्थाने "बह्याड"या शब्दाचे नागपुरी व वैदर्भीय संस्करण म्हणजे "भैताड"!
                       हा "भैताड" शब्द नागपुरातील मराठी भाषिकांबरोबर हिंदी भाषिकांमध्ये सुद्धा चांगलाच प्रचलित झालेला दिसतो,व ते याचा वापर करताना सहज दिसतात. पागल है--------!,बरोबर,   भैताड  है........! असं हमखास ऐकायला मिळू लागले आहे. शाळा-कॉलेज मधील सर्व भाषिक मुलं -मुली "भैताड"चा उपयोग सर्रास करताना दिसतात ,कुठल्याही कॉलेज कट्ट्यावर, कॅंटीनमध्ये चार-चौघांच्या बोलण्यात खास नागपुरी "भैताड है क्या बे"..... अगदी सहज मुक्तपणे ,ऐकायला मिळते.
                             भाषेतील काही विशिष्ट शब्दांमुळे आपण, व्यक्तिविशेषणाचे  मूळ गाव कुठले असेल हे सहज ओळखतो. या बाबतीत असाच एक किस्सा माझ्याही बाबतीत घडला ,झाले असे कि एकदा सहकुटुंब रेल्वेनी मुंबईवरून येत असताना मराठीतील एका सुप्रसिद्ध कलाकाराचे आई,वडील,व पत्नी (ज्या सुप्रसिद्ध गायिका पण आहेत )आमचे सहप्रवासी म्हणून समोरच बसले होते. मुलगी लहान असल्याने वरच्या बर्थवर चढणे ,उतरणे,असे स्वाभाविक खेळ करून बंदिस्त जागेत स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करीत होती,स्वभाव धर्मानुसार व काळजीपोटी बायकोच मुलीला सारखं सूचना अर्थात प्रेमळपणे ,कारण आपण चार-चौघात बसलो आहे याची जाणीव व एसी ने प्रवास असल्याने "स्टॅण्डर्डायझेशन"  "मेन्टेन"करावं लागत म्हणूनसुद्धा ! पण लहान वयचं ते! ,कोणी म्हंटले कि जास्त मस्ती करायची ,लोकांना आपल्या लीला जास्तीत जास्त दाखवण्याचा बालसुलभ अट्टाहास,त्यामुळे तिचे हे खेळ थांबण्याऐवजी अजूनच जोरात चालू होते ,शेवटी कंटाळून आतापर्यंत सामोपचाराने बोलणाऱ्या बायकोचा खास "नागपुरी" बाणा आता मुलीला आवर घालायला काम करू लागला बोलता बोलता तिने “भैताड”पणा करू नको,तडफडशील,धडपडशील ! हे वाक्य उच्चारताच आतापर्यन्त आम्हाला "नाशिककर" समजण्याऱ्या आजीने अहो,तुम्ही नागपूरचे का ?असा प्रश्न केला ,आम्ही मूळ नागपूरकर हे तुम्ही कसे काय ओळखले,असे विचारताच आजी म्हणाल्या अहो,तुम्ही मुलीला "भैताड" म्हण्टल तेव्हाच माझ्या लक्षात आलं! नंतर आमची गप्पांची छान मैफिल जमली ,एकत्र जेवणात आमचं तर्रीवाल भोकराचं लोणचे ,लसणाची झणझणीत चटणी "भैताड" शब्दाप्रमाणे त्या सगळ्यांनी सहज पचवली तो भाग वेगळा ,पण ह्या एका शब्दाने आम्ही "नागपूरकर"नक्कीच आहोत हे "स्टॅम्पिंग"मात्र केले.
                                           मूळ वैदर्भीय असणाऱ्या अनेक कलावंतांनी पुणे-मुंबईत जाऊन नाटक,चित्रपट क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला !त्यातही सध्या "भैताड"हा आपला खास शब्द स्वतःची वेगळी ओळख करून देण्यात भारत गणेशपुरे सारखे कलाकार मात्र कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. "चला हवा येऊ द्या "ह्या अत्यंत गाजलेल्या विनोदी कार्यक्रमात भारत गणेशपुरेंचा "भैताड"शब्द खुपदा जोरदार पंच मारून जातो व हा शब्द मराठीत बऱ्यापैकी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात ठेवण्याचे काम व या शब्दाला प्रचलित करण्यात त्यांचे योगदान नाकारता येत नाही. तसेच बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेली मराठी मालिका (अजूनही बहुतेक बंद झाली नाही!) "माझ्या नवऱ्याची बायको"यात उगाचच विदर्भातील लोक सर्रास न बोलणारी भाषा "वैदर्भीय"म्हणून का दाखवत आहे हे एक न उलगडणारे कोडे. पण ते चूक  कि बरोबर या भानगडीत न पडता  त्यात वारंवार येणाऱ्या "भैताड" या शब्दामुळे हा "टिपिकल"वैदर्भीय शब्द आहे याची ओळख साऱ्या जगताला करून देण्यात मात्र हि मालिका यशस्वी झाली आहे व त्याला प्रेक्षकांचे पाठबळ मिळाले आहे हे तेवढेच सत्य हि आहे.
                              मूर्ख,बावळट वेडपट बेअक्कल, समजत नाही,पागल इ. शब्दांची लाखोली वाहून आपली शब्दसंपदा व वेळ घालवण्यापेक्षा या सगळ्या विशेषणाचे एकच सामायिक नाव म्हणजे "भैताड"!वेगवेगळे पदार्थ जसे दूध ,दही,पोहे,लोणचे डाळ, मिरच्या इ. एकत्र करून जो काला करतात न तसेच!यात कुठल्याही भक्तीचा उपमर्द करायचा या अर्थाने नाही पण सगळ्या पदार्थाचे एकत्रीकरण त्याची चव किंवा त्याचा "इम्पॅक्ट"जो काही बनतो न तसाच ह्या सगळ्या विशेषणांचा "इम्पॅक्ट"ह्या एकाच शब्दाने व्यक्त होतो हे याच वैशिष्ट्य !थोडक्यत काय तर एकाच अर्थाच्या विविध शब्दांची बनवलेली चविष्ट व खुमासदार  "शब्द-भेळ"म्हणजे "भैताड" शब्द!
                           
                                                                         
 
                              मराठी भाषेची किंबहुना एखाद्या शब्दाची व्याप्ती कशी वाढवावी व त्या शब्दाला व्यापक ,मोठे स्वरूप कसे द्यावे याबाबतीत आम्ही मराठी भाषिक फारच चोखंदळ व विचारपूर्वक आग्रही असतो तसेच एखाद्या शब्दाला विस्तृत अर्थाने कसे वापरावे याचे अनेक उदाहरण आपल्या रोजच्या बोलण्यातून आपण नेहमीच व्यक्त करत असतो.
                            आता हेच बघा ना, मूळ शब्द "भैताड"हा तसेही अनेक विशेषणांचे एकत्रिकरण  करून बनलेला शब्द पण त्याची व्याप्ती "भैताडपणा" ( मूर्खपणा ,बावळटपणा करण्याची प्रत्यक्ष कृती किंवा एखाद्या व्यक्तीची वेडेपणाचे कृती), "भैताडवाडा" (एखादी बावळटपणाची सामूहिक कृती किंवा सगळ्यांचाच मूर्खपणा या अर्थाने ),"भैताडपात्र" ( आधीच मर्कट त्यातही प्याला अशी स्थिती ,भैताडपणाचं मेष पात्र या अर्थाने ),  "भैताडवांग" (यात वांग्याला एवढं तुच्छ का समजायचे माहिती नाही पण "वांग्या"हि एक आदरार्थी शिवी प्रचलित आहे त्यावरून एखाद्याला प्रेमाने? बोलवणारे संबोधन!)           
         "भैताड बोंगाडी " (एका स्त्री व्यक्तिमत्वाने नेहमीच बावळटपणाची किती परिसीमा गाठावी या अर्थाने योजिलेले खास विशेषण ) "भयुं" ( अगदी खाजगीत नवरा -बायकोच्या प्रेमालापात ,लाडाने केलेले संबोधन! ) अश्या अनेक मूळ शब्दापासून तयार झालेले हे खास शब्द भाषेची समृद्धता करण्यात भरीव योगदान देत असतात,आणि यात वैदर्भीय कुठेच कमी पडत नाही हे विशेष!
                        तर असा आमचा वैशिष्ट्यपूर्ण शब्द "भैताड" म्हण्टले तर साधा, म्हंटल तर खूप गर्भितार्थ घेऊन मिरवणारा!पर्यायी शब्द याला भरपूर आहेत पण ह्या "भैताड"मुळे  माझी बोली,प्रांत ,गाव,याची न सांगता हि समजणारी ओळख देणारा व आता विदर्भ सोडून अनेकांच्या ओठावर सहज थिरकणारा भाषेचा "लहेजा"सांगणारा वैशिष्ट्यपूर्ण शब्द!
                     मला माहिती आहे अतिशय चोखंदळपणे कुठलीही गोष्ट पारखून घेणारे वैदर्भीय दर्दी काही "भैताडसारखे" लिहते बे हा "हे तोंडावर सुद्धा सांगायला कमी करणार नाही तो परखडपणा आमच्यात आहे,पण मी हि तेवढ्याच "भैताडपणे" हे लिहीतच राहणार-----------------------!

30052020                                                                                                                             - मोहरा
                                                               
                                    

रविवार, २४ मे, २०२०

कुली

                                 कुली” ...ह्याला जीवन ऐसे नाव......!
                                  

                         "कुली "म्हण्टल्याबरोबर डोळ्यासमोर उभा राहतो तो लाल डगलेवाला ,डोक्याला लाल मुंडासं गुंडाळलेला रेल्वे स्टेशन वरील "हमाल"!
                                      तसा कुली हा मूळ शब्द इंग्लिश. मजूर,हमाल ,मजदूर या अर्थाने आपण सर्रास वापरतो, पण आमच्या नागपुरी भाषेत घराचे व इतर तत्सम बिगारी ,अनस्किलड काम करणाऱ्या पुरुषाला "कुली " व बाईला  "रेजा" म्हणून संबोधल्या जाते. 
                               माझं जीवनच रेल्वेशी निगडित असल्यामुळे कि काय मला कुली ह्या शब्दाबद्दल,त्या व्यक्तिमत्वाबद्दल एक विशेष आदर व जवळीक वाटण साहजिकच आहे ,जीवनाचा संघर्ष ते कसा कष्टाने,आंनदाने ,दुसऱ्यांचा भार हलका करून मजेत जगत असतात हे बघता त्यांचं कौतुक हि वाटते पण मन कुठेतरी हळवं सुद्धा होत आणि वाटत "ह्याला  जीवन ऐसे नाव"!
                               यांच्या कपड्यांचा रंग लालच का? दुसरा कुठलाच का नाही ?याचा विचार करता असं लक्षात येत कि प्लॅटफॉर्म वरून कुठूनही लाल रंग सहज दिसतो ,पटकन नजरेत भरतो. तसा रक्ताचा,(मेहनीतीचा )क्रांतीचा ,कामगारांचा रंग लालच ,म्हणून पहिलेपासून हाच रंग असावा ,कामगार विश्वात या लाल रंगाला अन्यनसाधारण महत्व आहे ,पण अति राजकारणामुळे हा 'लाल' आता ओहटीला जाऊ लागला व त्याची जागा "भगवा"वादळरूपात घोंघावयाला सुरवात झाली आहे ,परंतु आजतागायत यांचा रंग मात्र लालच आहे जणू रेल्वेचे "लाल”,सुपुत्र असल्यागत!
                                 आमच्या रेल्वेच्या भाषेत कुलींना "लगेज पोर्टर" किंवा "लायसन्स पोर्टर "म्हणून आम्ही संबोधतो,व तसा त्यांचा उल्लेख करतो. कुठेतरी कुली या शब्दाला न्याय द्यायला म्हणा किंवा मालक-नौकर या सरंजामी प्रवृत्तीतून बाहेर पडायला म्हणा,हे संबोधन सुटसुटीत व सोयीचे सुद्धा नक्कीच वाटत. 
                                                        गीतेतील सुप्रसिद्ध वचन "योगक्षेम वह्यामहं "किंवा भारतीय जीवन विमा निगमनी आपले बोध वाक्य केले असल्यामुळे जास्तच लक्षात राहिलेले हे वचन, तू निश्चिंत राहा,कार्यकारित राहा  तुझा योग , क्षेम,भार वाहून नेण्यास "मी" समर्थ आहे ,तसेच हा भारवाहक ,हमाल आपल्या सामानाचा भार स्वतःच्या डोक्यावर घेऊन आपल्याला निर्धास्तपणे चालायला सांगतो,आपला सगळा भार,ओझे स्वतःच्या अंगाखांद्यावर घेऊन आपली पोटाची खळगी भरायला का होईना पण एक प्रापंचिक परमार्थ साधत आपला "भार" स्वतः वहन करतो हे कुठेतरी मान्य करावेच लागेल. अर्थात हा व्यवसाय मजबुरीने,पोटापाण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेने त्यांच्यावरही "लादला"आहे हे तेवढेच सत्य!
                       तस कुली म्हणून कोणालाही उभं राहता येत नाही. दंडाला बांधलेला जाड पितळी नंबर असलेला  बिल्ला हे त्यांचं "आय-कार्ड"! रेल्वे प्रशासनाकडून रीतसर नोंदणी झालेल्यानाच कुलीचा बिल्ला मिळतो. त्याकरिता त्यांच्याकडून वार्षिक वर्गणी (अर्थात अत्यंत अल्प)घेतल्या जाते,मेडिकल फिटनेस त्यांना लागत असते ,तरच ते  "कुली" पदाकरिता पात्र असतात ,वडिलांचा बिल्ला मुलाला मिळतो पण सगळी पूर्तता झाल्यावरच. आता तर महिला कुलीपण दिसायला लागल्यात !जीवनाचा चारित्यार्थ चालवायला हा हि एक पर्याय म्हणून त्या या व्यवसायात पडल्या असाव्या पण आपल्या समाजव्यवस्थेचे विदारक चित्रण यातून प्रदर्शित होत असते असे सहज मनात आल्यावाचून राहात नाही. 
                    अश्या या सगळ्या कुलींची आता संघटना आहे,कुठल्यातरी देशपातळीवरील संघटनेशी असंघटित कामगार म्हणून जोडल्या गेले आहेत.युनियनबाजीत जे सर्व प्रकार चालतात ते इथेही दिसू लागले आहेत,"पण संघटन मे  शक्ती है "या उक्तीनुसार रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यायची त्यांची मागणी जरी अजून पूर्ण झाली नसली तरी वर्षातून एकदा संपूर्ण भारतात रेल्वेने फिरायचा "पास"मात्र संघटनेने पदरात पाडून घेतला आहे हेही नसे थोडके!
                                                             

                                                                                           
                              
                              वास्तविक सामान वाहून न्यायचे दर प्रशासनाने जरी ठरवून दिले असले तरी "कुली" आणि "आपले" दर आपणच ठरवत असतो. स्टेशनवर पोहचल्यावर कुलींचं मोहोळ आपल्याभोवती जमा होते त्यातून आपल्याला एकाची निवड करावी लागते,घासाघीसीनंतरच सेटलमेंट झाल्यावर आपला भार आपण त्याच्या डोक्यावर घालून निश्चिंतपणे त्याच्या मागे ,अर्थात तो बराच समोर ओझे घेऊन सुद्धा आणि आपण लोकांना चुकवत,धक्के खात लांबून त्याला शोधायच्या नजरेने आपल्या बर्थ पर्यंत पोहचतो. तसेच ,गाडी प्लॅटफॉर्मला लागल्याबरोबर धावत जाऊन नेमका डबा पकडणे,किंवा डब्यात कोणाकडे किती सामान आहे ,कोणाला आपली गरज आहे हे घारीपेक्षाही तीक्ष्ण नजरेने टिपून आपल्या अनुभवाने,सरावाने हे लोक सहज शिकून नेमकं ते गिऱ्हाईक पटवायचं काम व्यवस्थित करतात. कुली,कुली आवाज देणारे प्रवासी ५०-१०० करता शेवटी पर्याय नसल्याने ,नाइलाजाने सामान कुलीच्या हवाली करून हात हालवत बाहेर पडतात.  आम्हा, भारतीयांची मानसिकता फार विचित्र आहे,गरीब एखादा कामगार ,  भाजीवाला,मोची,रिक्षावाला,हमाल,कुली जितका गरीब ,मजबूर तितका आम्हाला त्यांच्याशी "भाव" करायला जास्तच चेव येतो,हॉटेलमध्ये १००-१२०चा डोसा किंवा ३००-५००चा पिझ्झा खाताना त्याची खरी किंमत किती याचा विचार करताना आमचा "घास"कुठेच अडकत नाही,मग येथेच आमचं अर्थकारण का आडवं येते हे कोड काही सुटत नाही. 
                               गाडीतून उतरल्यावर सामान जास्त असल्यास,'गाडी अभि लेके आता हूं' म्हणून हे महाशय निघून तर जातात ,अर्थात आपलं गिर्हाईक कोणी पळवून नेऊ नये म्हणून तजवीज करूनच!आणि त्याचा "अभी "मात्र "कभी" येतो हे  आपण  चातकासारखी वाट बघत बसतो,पण येतात नक्की!
                             गाडीला यायला वेळ असला कि जागेवरून 'आया साहब 'म्हणून गायब होतात,आपण ठरवलेला कुली कुठे दिसतो का,हे मान उंच करीत प्लॅटफॉर्मच्या गर्दीत शोधताना मान पार मोडीत निघते व सगळे हमाल आपलाच वाटायला लागतो पण तो, "तो" नसतोच, आपल्या जीवाची प्रचंड घालमेल चालली असते,गाडी आपल्यासमोर येत असते ,मनोमन त्याचा नावानी शिव्या देत स्वतः सामान चढवायची  मानसिक तयारी चालली असतानाच हे पुढ्यात दत्त म्हणून हजर !हे हि यांचं एक खास वैशिष्ट्य!
                             
                     
                                  स्टेशनवर कुली फक्त सामानच चढ-उतार करतात असं नाही,पण इतर तत्सम काम करूनसुद्धा ते आपल्या व्यवसायात वृद्धी करत असतात किंवा मुख्य व्यवसायाला पूरक जोडधंदा जोरात चालू असतो. गाडी प्लॅटफॉर्मला येत असतानाच चालत्या गाडीत उडी मारून आपला लाल पटका टाकून अनारक्षित सीट रिझर्व्ह करण्याचे कसब यांच्या रक्तातच भिनल असते,तिथे त्यांची दादागिरी व रेल्वे पोलिसांशी सलगी "अर्थपूर्ण" व्यवहार करण्यात मश्गुल असतात. (आता मुंबई सारख्या ठिकाणी जनरल डब्याचे लॉक पोलिसांच्या उपस्थितीत उघडतात व लाईन लावूनच प्रवेश मिळतो )
प्रवाशांच्या दृष्टीने आदरणीय असलेला आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे काळे कोटवाले तिकीट तपासनीस ,टीसी ! काही जणांशी यांची सलगी, ऋणानुबंध फारच घट्ट असतात ,शिल्लक असलेले बर्थ ,जागा हि युती "गरजवंतांना"च वाटप करत असते!(कारण गरजवंताला अक्कल नसते )काळी-लाल युती कधी गरजेपोटी ,नाइलाजाने,पर्यायनसल्याने पांढरपेशा खिशातून काळा पैसा सहज खिशात टाकत असते. (सुदैवाने आता हे प्रमाण नगण्य झाले आहे.)
                              रिझर्वेशनच्या लाइनमध्ये उभे राहून आपली 'वट' प्रवाशाला दाखवून ,स्वतःवरचा त्याचा विश्वास अढळ करणाऱ्या लकबी करत ,शिकलेल्या माणसाचा फार्म स्वतःच भरून त्याच्या शिक्षणाचे वाभाडे काढत तिकीट काढून देणे किंवा तुफान गर्दीत जनरलच्या तिकिटाकरता विशेष मेहरबानी असलेल्या तिकीट बाबूंकडून बाजूनी उभं राहत जसे पूर्वी सिनेमाचे ब्लॅक तिकीट काढणारे असायचे आणि आपण रागारागाने पण कुठेतरी असाह्य  असलेल्या भावनेने बघायचो तसेच तिकीट काढून पॅसेंजरला तिकीटासकट जागा मिळवून देण्याचं कौशल्य दाखवणारे बोटावर मोजण्याइतके कुली असतातच !त्याचं हे स्किल वर्क असत व त्याच्या परंपरांगत अनस्किल वर्क पासून हे सो-काल्ड  व्हाइटकालर कुली आपले वेगळेपण टिकवून असतात. 
                           प्रवाशांसाठी व्हीलचेअर प्रत्येक स्टेशनला उपलब्ध  असते,व ती प्रवाशांचे आप्त-स्वकीय सहज वापरू शकतात पण काही कुली  जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे इथेही आपली मक्तेदारी ठेवून असतात व त्याचे वंशपरंपरागत वाहक तेच असतात. स्टेशनवर प्रवाशांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठे कार्यालय असतात,ठराविक कुली त्या आफीसचे अनाफीशियल "आफिसबॉय "असतात,चहा-पाणी, खानपान व्यवस्था हि यांच्याकडेच लागली असते,कार्यालयीन कागदपत्रे, निरोप आदी फुटकर काम करण्यात यांचीच मदत असते,चार पैसेही सुटतात आणि ऋणानुबंधाच्या गाठीही  घट्ट होऊन व्यवसायात बरकत आणायला हे संबंध पुरेसे असतात. शेवटी हे सर्व व्यवसायिक क्लुप्त्या या सदरात मोडणारे म्हणून क्षम्य समजायचे!
                        एक मात्र खरं ,कि बहुतेक कुली जमात हि सरळ, साधी,मेहनती असते. अर्थात अपवाद हे प्रत्येक ठिकाणी असतातच!धावतपळत गाडी पकडणाऱ्याला चालत्या गाडीत सामानासकट ढकलणारे बिना मोबदल्याचे काम करीत असतात.गाडी उभी असताना गाडी खाली गेलेलं सामान ,चप्पल,छत्री ,काठी इ .काढून प्रवाश्यांचा जीव हायसा करणार काम हि यांचंच. चालती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात गाडी खाली जाणार्याचा जीव वाचवायचे काम प्लॅटफॉर्मवर सतर्क असणारे रेल्वेचे हेच "शिपाई"करीत असतात.  एखाद्या अपघाती प्रकरणात प्रशासनाला मृतदेह,किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला ऍम्ब्युलन्समध्ये टाकायचे काम पोलीस यांचा सहकार्याशिवाय करूच शकत नाही. हि यांची सामाजिक जबाबदारी व  उत्तरदायित्व मोठ्या आत्मीयतेने व सहजरित्या पार पाडत असतात,कुठल्याही फळाची अपेक्षा न करता हे यांचं अमूल्य योगदान नजरेत भरण्यासारखे आहे. 
                                                                              
                                                                         
                                                                     
            
                   
                        
                                         असा हा कुली रेल्वेचा चालत बोलता आत्मा आहे म्हणटलं तर वावगं ठरणार नाही,म्हणूनच फिल्मी दुनियेला पण यांचं आकर्षण सतत राहील आहे. 'कुली','कुली नं -१,इ. चित्रपट हिंदीत तर 'हमाल दे धमाल ' मराठीत बऱ्यापैकी "धंदा" या कुलींच्या जीवनपटावर आधारित राहूनच करू शकले. अमिताभच्या जीवनात जो दुर्दैवी प्रसंग उदभवला तो कुलीच्या चित्रीकरण्यादरम्यान त्यामुळे अमिताभचा कुली कायम प्रत्येकाच्या स्मरणात आहे. "सारी दुनिया का बोझ हम उठाते है "हे गाणं त्यांच्या जीवनातील वास्तविकतेचे कायमच दर्शन घडवीत असल्यामुळे रसिकांच्या चांगलेच लक्षात राहिले. 
मराठमोळ्या लक्ष्मीकांतचा हमाल दे धमाल असाच अफलातून चित्रपट गाजला,मराठी कुलीचे  जिवंत चित्रण यात प्रभावीपणे मांडण्यात आले होते.असो,पण या सगळ्या चित्रपटांमुळे कुलींकडे बघायचा दृष्टिकोन काही प्रमाणात तरी सकारात्मक झाला ,व हा पण आपल्यासारखाच मनुष्यप्राणी असल्याची जाणीव झाली हीच या चित्रपटांची फलश्रुती समजायची . 
                                          कुणी कुठलं सामान उचलायचं ,कुठला डब्बा कुणाचा,कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचे हे यांचं सगळं अलिखीतच असते त्यामुळे व्यवसायावरून हाणामारीचे कवचितच प्रसंग उदभवताना दिसतात व दिवसभर हे उत्तमरीतीने कार्यरत दिसतात. 
                                          आपला संपूर्ण भार दुसऱ्याच्या खांद्यावर ,डोक्यावर सोपवून आपण निर्धास्तपणे खाली हात ऐटीत चालण्याचा मोठेपणा हे कुली आपल्याला देत असतात परंतु,सध्या दोन चाक,चार चाक,असणाऱ्या मोठ्या-मोठ्या लगेज बॅग्समुळे कुलींच्या धंद्यावरपण विपरीत परिणाम झालेला दिसतो आहे,एस्केलेटर,बॅटरीवर चालण्याऱ्या गाड्या,कार ते कोच संकल्पना आदी बाबींची प्रवाशांची चांगलीच सुखकर सोय झाली आहे पण याची दुसरी तेवढीच वास्तविक बाजू म्हणजे हातावर पोट असणाऱ्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी कमी झाला आहे,त्यांना कुठेतरी ग्रहण लागले आहे ,नवनवीन सुविधा त्यांच्या जीवावर उठणाऱ्या साबित होत आहेत ,या करीता  प्रशासनाने त्यांना कुठेतरी सामावून घ्यावे  ह्यासाठी संघटना प्रयत्नशील आहेत पण यश मात्र कोसो दूरच आहे!  त्यांना विश्रांती कक्ष ,जेवण्यासाठी जागा,मेडिकल सवलत हे कागदोपत्रीच आहे प्रत्यक्ष चित्र विदारकच आहे आणि तेवढेच शाश्वत सत्यही!
                            " कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे"हे बिरुद या जमातीला अगदी फिट्ट बसते. आपल्या आयुष्याचा भारसुद्धा असा सहज कोणावर टाकता आला असता  तर........!कल्पनाच सुखावह असली तरी जो हा भार वाहणारा आहे त्यांचा विचार करता हे किती कष्टिक व सोशिक आहे हे या लोकांकडे बघूनच कळते,आपणही आपला भार या जीवनप्रसंगात सहजपणे दुसऱ्यावर ढकलत असतो,मग ते सहकारी,आई-वडील ,पत्नी कुणीही असो ,त्यांच्या दृष्टिकोनातून आपण विचारच करत नाही!अ, त्यात कायमोठं ?चलता है ,अशी आपली बेफिकीर प्रवृत्ती व सहज धारणा असते पण हा "भार"वहन  करताना समोरच्याच्या त्रासाची,कष्टाची थोडीशी जरी किंमत करता आली,किंबहुना त्याचे मोल जाणायचा आपण थोडा जरी  प्रयत्न केला तरी ती कोणाच्या तरी ऋणातून थोडीतरी मुक्ती मिळायची घटना नक्कीच ठरेल. स्टेशनवरील कुली हा दुसऱ्यांच्या  जीवनाचा भार वाहणाऱ्याला कुठेतरी समजून घ्या,हेच आक्रंदन करीत असावा असं सारखं राहून -राहून वाटत असत. जीवनाचं सत्य आपल्या रोजच्या जीवनप्रसंगातून उलगडून दाखवणाऱ्या या लाल डगलेवाल्याला ,भारवाहकाला मनापासून सलाम!

२२०३२०                                                                                                                                                                                                                                                                                                                     -मोहरा 
                                                                        













मंगळवार, १९ मे, २०२०

TARA

                                 बंगलोर निवासी श्री रमेश व सौ वर्षा संगमनेरकर यांना नातं झाली,अर्जुन व सुरभी उभयतांना गोड कन्यारत्न प्राप्त झाले त्या निमित्याने त्यांचे अभिनंदन करताना सुचलेल्या काही ओळी--------- अर्थात चि. ताराचे अभिष्टचिंतन!
                                                         
                                                         
                                                
                   साजरा गगनी एक "तारा" 
                             
          गगनातुनी हर्षोल्हासाचा नाद घुमतसे सारा!
           बघा,अवतरली हि अवनीवरती हो  "तारा "!!
                                
        कोमल कांती निर्मळ, निष्पाप,चेहरा सदैव दिसे हासरा!
                          
       रूप न्याहाळता वाटे उतरली जणू स्वर्गीचीच अप्सरा !!
           
      कौतुकाच्या "वर्षा"वात चिंब भिजली अवघी हि धरा !                                                                                 जीवनी या "दादा"च्या वाहतो अमृताचा खळ -खळणारा झरा !!

    दरवळे आसमंती "सुरभी" बघता गोड आपुल्या अंकुरा !
     लक्ष्य एकच "अर्जुनाचे"रम्य फुलवी आता छान संसारा!!
                       
   कधी करू या उधळण आता या  शुभ्र चांदण्यांची सत्वरा!
  आतुरली वाट बघता असशी  दूर देशी अनुराधा नक्षत्रा!!
  
   फुलों असाच सदा संगमनेरकरी सुरेख हा फुलोरा !
  उधळीत सप्त-रंग पसरू दे मन्मनीचा मोरपिसारा!!

  नात्याची  गुंफण करीत सजू दे सुंदरसा,नाजूकसा गजरा!
   उधळीत क्षण भाग्याचे ,सोन्याचे वेचितो हा "मोहरा"!!
१८०५२०                                                                                                                                           -मोहरा

                                   

रविवार, १७ मे, २०२०

भोवरा

                                      “भोवरा”
                                             
                        रम्य ते बालपण !बालपणीचा काळ सुखाचा!असं म्हण्टल्या जाते न ते शब्दशः खरंही आहे. आमच्या बालपणात आजच्या सारखे मोबाइल, काम्पुटर,व्हिडीओ गेम्स इ. काहीच नव्हते,पण बालपण अगदी हवं हवंस वाटणारे व खूप मजेत गेले ते तेव्हा असलेल्या सगळ्या खेळांनी,अगदी झपाटल्यागत आम्ही त्या खेळांच्या आहारी पूर्णतः गेलो होतो किंवा ते खेळच आमचं आयुष्य व जीवनाचं एक अविभाज्य अंग बनले होते एवढं मात्र नक्की!
                  कंचे, भोवरे,गिल्ली-दांडू ,रेषटीप ,डब्बा -ऐसपैस ,रिंग,टायर चालवणे ,सूर-काडी,सळाख खुपसणे इ. खेळ शाळा कधी सुटते व खेळायला कधी पळतो अश्यागत आम्हा सर्वांची अवस्था व्हायची.  
                   अश्यातलाच एक माझा आवडता खेळ म्हणजे "भोवरा" तसा, चालवायला ,खेळायला थोडा उशिराच लागलो कारण ते तस माझ्या दृष्टीने कठीण प्रकरण होते,पण एकदा जमायला लागल्यावर मात्र त्याने पुरते वेड लावले  व एखाद्या सराईतासारखा मी सुद्धा भोवरा डाव्या हातात पकडून त्यावर उजव्या हाताने जाळी गुंडाळून फिरवायला शिकलो व झटक्याने हवेत फेकून हातावर घेण्याचे कसब उत्तमरीत्या आत्मसात करून घेतले. 
                  लाकडाचा असणारा,शंकाकृती आकार असलेला हा प्रकार तसा अवघडच,त्याला खाली असणारी "आरू "(लोखण्डी निमुळते टोक ) व गुंडाळायला "जाळी"(जाड दोरी ) ती गुंडाळून हाताला विशिष्ट झटका मारून जाळी हातात ओढली कि भोवऱ्याची चक्राकार गिरकी मस्त यायची व तो फिरत राहायचा. आमचे प्रायमरीतले मास्तर (अर्थात लहान गावातले )भूगोल शिकवताना पृथ्वीची माहिती भोवऱ्याचे उदाहरण देऊन छान शिकवायचे कारण बहुसंख्य विद्यार्थी कंचे,भोवरे यांचे परम भक्त होते,बरेचदा मास्तरांचा मूड खराब असला कि अचानक दफ्तर तपासणी व्हायची आणि मोठ्या प्रमाणात कंचे,भोवरे आदी तत्सम खजिना हेडमास्तर दरबारी जमा व्हायचा ,हेडमास्तर हा खजिना आपल्या मुलांच्या झोळीत नक्कीच टाकत असावे हा बालसुलभ वयाला  पडलेला प्रश्न !मी मात्र या सगळ्यापासून जरा लांबच राहायचो कुठेतरी त्याला असलेल्या अणूकचीदार टोकाची भीती दुसरं काय?
                   इंग्रजी वर्णमालेच्या पुस्तकात किंवा शाळेतील वर्गाच्या भिंतीवर लटकलेल्या "चार्ट"मध्ये "T" फार टॉप म्हणजे भोवरा असं शिकवायचे ,भोवऱ्याची  हातात न घेता हि पहिली ओळख !नंतर आयुष्यतील वादळात असे अनेक भोवरे अनुभवायला मिळाले पण त्याच्या जाळीचा कंट्रोल आपल्या हातात असल्यामुळे कि काय त्या कुठल्याच भोवऱ्यात न अडकता आयुष्याची वाटचाल सुरु आहे. 
                   पूर्वी फक्त लाकडाचेच भोवरे मिळायचे नंतर एखाद्या जत्रेत, यात्रेत प्लॅस्टिकचे भोवरे पण बघायला मिळायचे,आता हल्ली फायबरचे पण मिळतात म्हणे,पण लाकडाचा भोवरा फिरवण्यात जी मजा आणि "स्किल" आहे  न  ते दुसऱ्या कशात नक्कीच नाही. 
                 भोवरा फिरवणे ,खेळणं हा म्हणटल तर एकट्याने किंवा सामूहिकरीत्या खेळण्याचा खेळ. फार थोड्या खेळांना हे भाग्य प्राप्त झाले आहे. अगदी एकलकोंड्या ( घरकोंबड्या! )मुलाला सुद्धा हा खेळ सहज खेळवतो. मुख्यत्वे हा खेळ म्हणजे मुलांचीच मक्तेदारी,मुली फारश्या ह्याच्या वाटेला जात नसत पण एखादवेळी एखादी जेव्हा शिताफीने फिरवायची तेव्हा खरंच कौतुक वाटायचे,याच मुली नंतर संसारात नवरा नामक विशेषणाला   गर-गर फिरवून जेरीस आणतात व लहानपणी भोवरा न फिरवल्याचे उट्टे सहज काढतात असे कुठेतरी उगाचच वाटते. 
                     रिंगणात भोवरे ठेऊन त्यांना बाहेर काढणे ,भोवरे एकत्र फिरवून जो आधी थांबला तो हरला या पद्धतीचे खेळ आम्ही खेळायचो,जो हरला त्याच्या भोवऱ्यावर आपल्या भोवऱ्याच्या "आरूने"  "गुच्ची" मारायची तसा थोडा अघोरी प्रकार पण हरल्यानंतरची शिक्षा त्या भोवऱ्याला अश्या स्वरूपात मिळायची ,त्याकरिता प्रत्येक जण आरू जास्तीतजास्त टोकदार ठेवायचा प्रयत्न करायचा ,हरलेल्या मित्राच्या भोवराला गुच्ची मारताना समोरच्याचा भोवरा पुरता विद्रुप करून टाकायचा,काही दिवसांनी तो अगदी देवीचे व्रण झालेल्या चेहऱ्यागत दिसायचा,प्रसंगी त्याचे दोन तुकडेही व्हायचे पण हे करताना एक "आसुरी आनंद " प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकायचा !हा आनंद जरी आसुरी वाटत असला तरी तेव्हा तो जिंकलेल्या योध्याचे समाधान कुठेतरी देऊन जायचा व जेतेपणाची ख़ुशी नकळत चेहऱ्यावर दिसायची. पण खेळाडूला कुठलीच शिक्षा  न देता,त्याच्या वस्तूला देणं हे खिलाडूवृत्तीची व औदार्याची जाणीव करून देणारी तेवढीच महत्वाची !
                   या भोवऱ्याचा एक "स्किल"असलेला प्रकार म्हणजे भोवरा हवेत फिरवून उसळी घेत तळहातावर घ्यायचा व फिरवायचा काहींना सहजच जमणारा तर काहींना प्रयत्नांती परमेश्वर गाठण्यासारखा!जमिनीवर फिरत असलेला भोवरा अलगद तळहातावर घेण्याचं कसबही  याच पठडीतील पण  ही मक्तेदारी असणारे मात्र ठराविकच. हाच भोवरा जाळीने तळ हातावर अलगद ओढून घ्यायचं दिव्य काम करणारेही काही कमी नव्हते. 
                         भोवऱ्यात विशेष रुची असणारे किंवा आम्ही ज्यांना टारगट ,व्रात्य समजायचो असे दर्दी महाभाग दोन आरुवाला भोवरा बाळगण्याचे सामर्थ्य दाखवायचे अर्थात त्यांच्या वाटयाला चुकूनही न जाता आम्ही मात्र आपले  हित बघून सरळ वाटेनेच जायचो.        

                                                                     




                                  भोवरा शब्द उच्चारताना "भवरा" असा केल्या जातो,पण हा भवरा म्हणजे हिंदीत भ्रमर !मधुकर वण वण करीत गुंजारवाला करणारा भ्रमर,स्वतःला भवऱ्याची उपमा देऊन प्रेयसीच्या मागे फिरणारा ,नादान,वेडापिसा,भवरा!एका "ओ"ची मात्र कमी जास्त झाली कि शब्दामध्ये ,भाषेमध्ये किती फरक पडतो नाही?असो,मात्र भोवऱ्याला हिंदीत लट्टू म्हणतात,का म्हणतात हे हिंदी भाषाशास्त्रज्ञच सांगू शकतील पण बालपणात आपण या भोवऱ्यावर शब्दशः “लट्टू" झाले होतो हे तेवढेच खरे!
                                      आपलं आयुष्यही तस या भोवऱ्यासारखच आहे,आयुष्याची "आरू "व्यस्थित असेल तर हा भोवरा योग्यरीत्या जाळीच्या साह्याने फिरत राहणार जर जाळी योग्यरीत्या न बसवता ,भोवरा फिरवला तर तो आरुवर न फिरता तसाच आडवा फिरतो अशीच आपल्या आयुष्याची फटफजिती झाल्यावर बघायला तत्पर समाजमन टपलेलेच असते!
                                    भोवरा उलटा फिरवणं हे सुद्धा एक कसब आहे. ज्या आरुमुळे भोवऱ्याचा डोलारा पेलल्या जातो ,त्याच आरुला आकाशाकडे बघायला लावून ,डौलात  भोवरा उलटा फिरवणे म्हणजे दैवाचे फासे कितीही उलटे पडले तरी फिरण्याची क्रिया  म्हणजे आयुष्य विपरीत परिस्थितीतही ढळू न देता मार्ग काढण्याची कला आत्मसात करण्यासारखे आहे,हेच याच्यातून शिकायला मिळते. 
                                  सुरवातीला भोवरा या क्षेत्रातील दादा लोक भोवरा जर फिरवता नसेल येत तर "बायल्या हाताने"फिरवायला सांगायचे म्हणजे अंडर आर्म करून खचका ओढल्यागत जाळी आपल्याकडे ओढायची,पण याला "बायल्या" का म्हणायचे हे मला आजगायत कळले नाही पण त्यातही भोवरा फिरायचा उत्तमच !उगाचच माझ्यातला स्त्री मुक्तीवादाचा विचार तेव्हा नाही पण आता जोरात उचंबळून  आला हे नक्की! 
                              गोल-गोल येणाऱ्या चक्रीवादळाला पण आपण भोवराच म्हणतो,दुरून ते दिसताच आपण त्याच्यापासून बचाव करतो,मला अजूनही अपूर्ण राहिलेली बालसुलभ इच्छा म्हणजे त्याच्यात उभं राहून आपण गोल फिरतो का हे बघायचं होत! आपल्याबरोबर धूळ ,कागद,कचरा सामावत फिरणार ते चक्रीवादळ "भोवरा"मात्र निसर्गाचं आगळ-वेगळं रूप दाखवत असतो. 


                                                                 




                             असाच एक “भोवरा”  नदीपात्रात असणारा!असतो का खरच कि कपोकल्पित गोष्ट,माहिती नाही ,कधी अनुभवला नाही परंतु नदीत उतरताना तिकडे जाऊ नको तिथं भोवरा आहे म्हणून काठावरून काळजीयुक्त सूचना मात्र मिळत असतात,आणि त्या भोवऱ्यामुळे अनेकांचे प्राण  पण गेलेले सुद्धा कळत असतात. थोडक्यात काय तर निसर्गाच्या भोवऱ्यात आपण कधी अडकू नये तो आपली दुर्दशाच करतो,तसच कुठ्ल्याच मोहरूपी भोवऱ्यापासून न अडकता आयुष्याची वाटचाल करावी हाच बोध निसर्गाकडून आपण शिकला पाहीजे 
                     

                       असाच अजून एक पूर्णतः काल्पनिक (कारण मी विज्ञानवादी! )भोवरा अर्थात "चकवा"बरेच जण याला भोवरा पण म्हणतात! लहान खेडेगावात हा नेहमी चर्चेत असणारा भीतीदायक प्रचलित शब्द व त्याचा हमखास अनुभव घेणारे भेटतातसुद्धा! हा एकदा मागे लागला कि माणूस फिरतच बसतो भोवऱ्यासारखा!जो  पर्यंत कोणी हटकत नाही तो पर्यंत! खर का, खोटं, देवच जाणे पण खेळण्यातल्या भोवऱ्यासारखाच हा फिरायला लावणारा म्हणून "भोवरा"!
                         लहानपणी आपले सवंगडी आपल्या डोक्यावर किती भोवरे आहेत हे बघायचे. दोन भोवरे म्हणजे तुला दोन बायका मिळतील असे ठासून सांगायचे ऐकून कुठे तरी मजा वाटायची,मलाही दोन भोवरे होते पण एकच बायको मोठ्या नशिबाने मिळाली ,दुसरीचा तर विचारही करू शकत नाही तेव्हा हे किती सहज म्हणून जायचे हे आठवले कि बालपण किती निरागस असते हे पटायला लागते.  असो,गमतीचा भाग सोडला तर भोवरा म्हणजे गोलाकार, चक्राकार वस्तू हा सहज निष्कर्ष यातून निघतो. 
                              हे सगळे भोवरे निसर्गाचे, शरीराचे,खेळातले आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले असले तरीसुद्धा भोवरा म्हणजे लहानपणीचा  मस्त सवंगडी हे घट्ट समीकरण मनात पूर्णतः ठासून भरलं आहे. 
                             ह्या भोवऱ्याचे दिवस आठवले की आयुष्यही आपलं कस  भोवऱ्यासारखच आहे हे प्रत्कर्षाने जाणवायला लागते. जन्मभर सारेच आपले आयुष्य गर-गर करीत फिरत असते,संसाररूपी "जाळी "जीवनाच्या अपरिहार्यतेची "आरू "त्याला सहज फिरवत असते. योग्य ठिकाणी जाळी नीट बसली व नियतीचा झटका योग्य तो आपल्यादिशेने सहज पडला कि आयुष्याचा भोवरा मस्त फिरत राहतो,कुठलीही आडकाठी न येता त्याला नाजुकश्या तळहातावर सहजरित्या पेलता येत!पराभवाच्या प्रसंगातही "गुच्ची" कितीही बसल्या तरी परत नव्या उमीदीने आयुष्याचा खेळ हसत -हसत पुढे नेता येतो. हाच भोवरा "आरु "वर करून फिरला कि आयुष्यही असच फरफटत -फरफटत फिरत जाते हे नक्की याच करिता आयुष्याचा हा भोवरा असाच अलगद ,चलाख पद्धतीने ,योग्यरीत्या फिरवता. आला पाहिजे तरच जीवनाचे सार्थक होईल हाच संदेश फिरणारा "भोवरा"देत असतो.  
                                                                                   
170520                                                                                                                                   - मोहरा                                                                                                                                         

बुधवार, १३ मे, २०२०

पत्र लेखन

                        वाचकांचे मनोगत/प्रासंगिक  (तरूण भारत नागपूर दि.१७-०५-२०२० )

                                       

                   अंधारातील "चंद्र" -शेखर 

                   कोरोना महामारी संकट संपूर्ण जगात हाहाकार माजवते आहे. सरकार,शासन आपल्या परीने ह्या संकटावर मात  करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे .सगळे राज्य सरकारे,केंद्र सरकार ह्या अदभूत विषाणू पासून जनतेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्नात आहे.
                   अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, दानशूर या कामात सरकारच्या खांद्याला खांदा भिडवून समाजाचे ऋण फेडायचा आपाआपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकसंघा सारखे संघटन जे कि नेहमीच राष्ट्रकार्यात अग्रेसर असते ,आजही कुठलाही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून दूर राहात या राष्ट्रकार्यात सिंहाचा वाटा उचलत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी १०-१२तास पीपीई किट घालून डाँक्टर्स ,नर्सेस या लोकांबरोबर जीवाची पर्वा न करता अन्यनसाधारण मदत करीत आहेत. ज्यांच्या रक्तातच सेवा कार्य भिनल आहे त्यांचं कौतुक तरी कोणत्या शब्दात करावं? एक अतुलनीय राष्ट्रकार्य हि आणि इतर संघटना,संस्था, व्यक्ती करीत असतानाच दुसरीकडे विचित्र व विदारक चित्र बघायला मिळते आहे.
             चमकोगिरी अंगातच भिनल्या गेलेली एक विशिष्ट जमात अश्या कठीण प्रसंगीसुद्धा आपला कार्यभाग मतलबीपणे साधून घेत आहे . गरजू व्यक्तींना मदत करत असतानाचे फोटो,त्यांच्याबरोबर मदत केल्याचा दिखावा सोशल मीडियावर जाहीररीत्या सादर करीत आहे. मदत दुसऱ्याची ,पैसा दुसऱ्यांचा पण हे महाभाग स्वतःच्या नावावर बिनधास्त त्याचे श्रेय लाटताना दिसत आहे. सरकारी पैसा ,मदत जणूकाही स्वतःच्या ,पक्षाच्या खिशातून दिल्यासारखे पत्रक काढून ,गरीब गरजूना स्वतःच्या ,नेत्याच्या नावाने घोषणा दयायला लावून अत्यंत अशोभनीय किळसवाणे प्रकार करीत फिरत आहेत ,हे अत्यंत दुरदैवी आहे.
              दुसरीकडे ,पण, असे बरेच  दानशूर आहेत जे ज्यांच्या-त्यांच्या ऐपतीप्रमाणे किंबहुना जास्तच समाजाबद्दल उत्तरदायित्व निभावण्यात खारीचा का होईना पण सिंहाचा वाटा समजावा असे कार्य करीत असताना या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागू देत नाहीत हे विशेष!
            हयांचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे आमच्या वसाहतीतील हनुमान मंदिराचा  चौकीदार !मागील दिड महिन्यापासून "मैत्री" परिवाराच्या आवाहनानुसार वसाहतीतील नागरिक पोळ्या जमा करायचे काम करीत असताना हा नित्यनेमाने आपला वाटा त्यात स्वेच्छेने टाकत असतो. घरात खाणारे पांच तोंड असताना, लाकडाउनमुळे इस्त्रीचा व्यवसाय जवळपास बंदच असताना,कुठलीही आवक फारशी नसताना त्याची हि समाजसेवा लाखभर पैसे वाटणाऱ्या श्रीमंतमाणसापेक्षा   नक्कीच काकणभर उजवी वाटते !"गुणवंत" वाटते!
               असेच कितीतरी अप्रकाशित तारे या समाजरूपी नभात आपले स्थान टिकवून आहेत असाच एक अप्रकाशित तारा म्हणजे "चंद्र-शेखर"!
             मागील महिन्यात समोरच असण्याऱ्या झोपडपट्टीतील गरजू रहिवाश्यांना पाचशे रुपये प्रति व्यक्ती आवश्यक किराणा सामान एकत्र करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या मदतीने व जवळच्याच पोलीस चौकीतील पोलिसांच्या साह्याने त्याचे वाटप कुठलेही  गाजावाजा न करता केले हे विशेष!
           केंद्र सरकारच्या साधारण श्रेणीत कार्यरत असताना आलेल्या वेतनातील पन्नासहजार रुपये पंतप्रधान निधीला देण्याचे औदार्य त्याने सहजच दाखवत ,त्याविषयी कुठेच वाच्यता केली नाही!


            सामाजिक बांधिलकीची सतत जाण ठेवणार हे कुटुंब नेहमीच घरची काम करणारी मोलकरीण, पोळेवाला पंडित ,गाडी पुसणारा, गरीब होतकरू गरजू ह्यांच्यासाठी लग्न,आपरेशन ,शैक्षणिक गरज,इ. कामांसाठी नेहमीच हजारोंची मदत कुठलीही अपेक्षा न ठेवता परत्यावयाची अपेक्षा न ठेवता सतत करत असतात.
         मागील दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा देणारे सोडले तर सगळे सरकारी कर्मचारी घरी बसून वेतन घेत आहेत, पण हे आगळेच व्यक्तिमत्व असण्याराला हे कसे पटेल?आपले पोस्टिंग नागपूरच्या बाहेर असूनही व सद्य परिस्थितीत तेथे जाणे अशक्य असल्याने त्याने प्रशासनाला घरी न बसता नागपुरातच आफिसमध्ये काम द्यायची विनंती केली ,आता रोज दहा ते पांच तो आपली सेवा  देतो आहे!,अर्थात बाकी सहकाऱ्यांचा रोष पत्करून!
                     
      समाजात अनेक दातृत्वानं आहेत,लाखो,करोडोचे त्यांचे समाजाप्रती अनमोल,बहुमोल  योगदानहीआहे पण केवळ ठराविक स्रोतांच्या भरवश्यावर समाजाचे ऋण फेडणारे हा अप्रकाशित चंद्र-शेखर व गुणवंत मला मनापासून भावले. काहीही न करता सतत चुका दाखवणाऱ्या अनेक समाजबांधवांना हे उदाहरण पुरेसे बोलके ठरावे. आपणही समाजाप्रती काहीतरी करू शकतो जे आपल्याजवळ आहे त्यातूनच!न कि मी व माझे कुटुंब एवढाच विचार करता ..... !
     अश्या ह्या अप्रकाशित "चंद्राला" माझा मनापासून सलाम! अश्या व्यक्तींचा,त्याच्या कार्याचा ,छोटासा का होईना आदर्श निदान काही प्रमाणात जरी अंगी आचारला तर समाजाचे ऋण काही तरी आपण नक्कीच फेडू शकतो हाच विश्वास या कठीण प्रसंगी आपण बाळगू या व त्याप्रमाणे राष्ट्र कार्यात आपलाही खारीचा वाट उचलू  या, हेच या निमित्त्याने सांगणे.


                                                                                                                                                                                                                                                                                                                             -   हेमंत मोहगावकर
                                                                                                                                                                                                                                                                                                                                 ९४२३९१३०३०  

मंगळवार, १२ मे, २०२०

मोगरा

                                       मोगरा
                                   
                                                              

  •                                                मोगरा! म्हणटल कि प्रत्येक मराठी माणसाच्या मनःपटलावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची भावरचना ,गानकोकिळा लता  मंगेशकरानी अजरामर करून ठेवलेली ,कळात नकळत  रुंजी घालू लागते आपण सहजगत्या ती गुणगुणायला सुद्धा लागतो ."फुले वेचिता  बहरू काळियासी आला",  "इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी",काय सुंदर रचना खरच , आपले थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांच्याकडून शिष्यत्व प्राप्त झाल्यानंतरची हि अनुभूती कि ज्ञानेश्वर महाराजाना दिव्यत्वाची आलेली प्रचिती हा संतसाहित्याचा अभ्यास करणारे, विचारवंत,श्रेष्ठ भाष्यकार यांचा विषय ,माझ्यासारख्या सामान्याला मात्र ह्या काव्याची सुंदर रचना,स्वर,संगीत, स्वर्गीय अनुभूती देऊन जातात हा मोगरा आपल्यासुद्धा जीवनात कसा भरलेला आहे,बहरलेला आहे  याची कुठेतरी नक्कीच सुखद जाणीव करून देतात.
                           मोगरा ज्याचे जीवशास्त्रीय नाव जॅस्मिनम सॅम्बक असून ओलिएसी कुळातील जाई,चमेली,जुई यांच्या हा जातकुळातील .(हे अर्थात गुगल शास्त्र !)प्रत्येकाच्या  घरी-दारी किंबहुना हृदयात घर करून राहिलेल्या शुभ्र, निर्मळ मोगरा ज्याला इंग्रजीत "अरेबियन लिली" असे म्हणतात ,कधी सिंगल ,कधी डबल ,- पाकळी असलेला ,बट मोगरा आदी स्वरूपात नेहमी बघायला मिळतो.
                           तसा,फुलांचा राजा म्हणजे "गुलाब"!पण, मला मात्र भावतो पांढरा शुभ्र ,अंतनिर्मळ असलेला , हिरवे चुटुक देठ असलेला आणि तेवढाच मंत्रमुग्ध सुगंध देणारा मोगरा!  
                          पावसाळ्यात किंवा एरवीही साधी फांदी जरी जमिनीत खुपसली तरी जगणारा, सरळ साधा हा मोगरा कि गुलाबासारखा राजेशाही थाट असलेला,अगदी बंडिंग वगैरे करून जोपासलेला ,आणि मुख्य म्हणजे राजे,महाराजे,श्रीमंत,यांच्या प्रसादात ,बागेत  फुलणारा,थाटामाटात कौतुक करवून घेणारा अनभिषिक्त "राजा"!  अती विशेषण नसलेला ,पण  लग्नकार्यात वधू-वरांच्या गळ्यात जरी गुलाबपुष्पांचा भला मोठा हार असला तरी वधूचा शृंगार मात्र या फुलांच्या गजरा-वेणीशिवाय अपूर्णच असणारा!,पण अंतरंगी जपणवूक केलेला ,मनभावन असलेला ,आपल्या सुगन्धाने  आसमंत दरवळून टाकणारा मोगराचं.


                                                                        

                                   तसे माझे आयुष्य फुलत  गेलं या मोगऱ्याच्याच सानिध्यात!आमचं दोन मजली  घर होत, “ग्रीनफिन्गर"असं काहीस म्हणतात ते असण्याऱ्या आमच्या पिताश्रींनी लावलेलं इवलेसे रोपटे थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचलं ,  मोगऱ्याचा वेल थेट गच्चीपर्यंत संपूर्ण गच्चीतच पूर्ण ताकतीने बहरलेला राहायचा!मार्च ते मे या महिन्यांमध्ये मोगरा प्रचंड बहरायचा,काळ्याशार आकाशात जस पांढरंशुभ्र चांदणे लखलखते त्यागत हा हिरव्याकंच पानांमधून खूप फुलायचा, बहरायचाखरंच ज्ञानदेवांनी वर्णन केल्यागत खाली पडलेली फुल वेचता वेचता कळ्या कधी बहरून  यायच्या हे हि कळत  नसे.
                                       
                             
                                       अश्यातच, एक दिवस अचानक  “ती" माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात एक छानस ,टपोरेदार मोगरा बनून बहरू  लागली. तिच्या येण्याने माझ्या जीवनरूपी अंगणात धुंद मोगऱ्याचा मंद मंद सुगंध दरवळू लागला..
                                              तिच्या मनातील निर्मळपणा,वागण्यातील हिरवेपण,सरळ,साधा ,स्वभाव मोगऱ्यासारखच, शुभ्र रूप ,मला कधी भावल हे लक्षातच आलं नाही व "तो" मोगरा माझ्या हृदयावर कधी हिंदोळे घालू  लागला हे केवळ त्या मोगऱ्याला आणि त्या वेलीलाच ठाऊक. पण एवढ मात्र खरं कि तिच्या सुगंधिरूपी येण्याने माझे मन बेधुंद झाले,त्या शुभ्रतेने जीवन सुखावले!

                                              काहीतरी निमित्त काढून ती घरी यायची,मीही उत्साहाने भरभर गच्चीत जाऊन ,मधल्या माळावर चढून खुप-सारी परडीभर फुले तिला गोळा करून देताना, उमलत येण्याऱ्या टपोऱ्या कळ्या खुडून देता,देता कधी नकळत तिच्या प्रेमात पडलो  हे कळलंच नाही आणि मोगऱ्याच्या सुगंधासारखेच आयुष्यही सुगंधित झाले. ऐन वैशाख वणव्यात त्या मोहरलेल्या सुगंधी श्वासाने अंतरंगात पेटलेल्या दाहेला शीतलतेचा  आभास नक्कीच होत होता. भरभरून बहरणाऱ्या मोगऱ्याच्या फुलासारखेच आमचे प्रेम मात्र बहरतच होते. आणि याचा एकमेव साक्षीदार मोगराचं.
                                            म्हणून तर मला हा मोगरा आपलासा वाटतो ,लग्नाच्या आधीचे सगळी सुख,दुःख हितगुज याच तर मोगऱ्याच्या साक्षीने गुजगोष्टी करत राह्यच्या ,आयुष्यातील उमलत्या कळ्यांचा बहर याच वेळी मोगरा-फुलांनी अनुभवला होता.प्रेमासारखे देवाचं देणं लाभलं ते याच्या संगतीतच,मग का नसावा हा माझा जिवलग सखा?



                         
                                           

                                         लग्नानंतर मुंबईला असताना संध्यकाळी आफिसमधून येताना मोगऱ्याचा गजरा हमखास आणायचो, हिरव्या पानांच्या पुडित बांधलेला गजरा ती सर काही भरून काढू शकत नव्हता ,पण कुठेतरी मन मात्र जुन्या आठवणीत हमखास रमायचे ,आणि ते सुखद क्षण परत परत अनुभवायची नक्कीच अनुभूती देत राहायचे. आता संसार-रगाड्यात हे कुठे तरी विस्मृतीत गेल्यासारखे झाले आहे काळाच्या ओघात "ती"लांबसडक दोन वेण्या असणारी ,आणि बरेच वर्षे गजरा -वेणीला  न्याय देणारी आता कालानुरूप,वयपरत्वे ,कालपरत्वे बदलली आहे तरी सुद्धा कार्यप्रसंगी उसने का होईना पण कृत्रिम केशसंभाराने जुन्या आठवणी जाग्या करायचा प्रयत्न करत असते, मीही तेव्हढाच मन:पटलावरील  धूळ बाजूला सारून पूर्वीच्या  आरश्यात डोकावण्याचा प्रयत्न करीत असतो.
                                           असा हा जीवनरूपी मोगरा अजूनही तसाच फुलतो आहे,बहरतो आहे ,दिल्या घेतल्या वचनरूपी खतपाण्याचे यशस्वी रोपंण त्याचात झाले आहे ,त्यामुळे तो आजही आपले वचन त्याच फुलांप्रमाणे जपतो आहे ,आज आमच्या तीन मजली घरात मोगऱा वेल तसाच बहरलेला दिसतो आहे कुठेतरी आयुष्याची  केलेली सुरवात, याच मोगऱ्याच्या साक्षीने पूर्णत्वास नेणारी हि एक संध्याकाळ  ठरू पाहते आहे ,कायमच सदा साथ देणारा असा हा पांढरा  शुभ्र,आल्हादायक ,सुगंधी मोगरा आयुष्यभर असाच सतत बरोबर असू दे हीच मन:पूर्वक इच्छा,आणि  विध्यात्याकडे  याचना! 
                                                                                    


120520                                                                                                                                                    मोहरा

झंडू

                                               "झंडू"-बाम नाही एक विशेषण                                                   ...