मोगरा
अश्यातच, एक दिवस अचानक “ती" माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात एक छानस ,टपोरेदार मोगरा बनून बहरू लागली. तिच्या येण्याने माझ्या जीवनरूपी अंगणात धुंद मोगऱ्याचा मंद मंद सुगंध दरवळू लागला..
- मोगरा! म्हणटल कि प्रत्येक मराठी माणसाच्या मनःपटलावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची भावरचना ,गानकोकिळा लता मंगेशकरानी अजरामर करून ठेवलेली ,कळात नकळत रुंजी घालू लागते व आपण सहजगत्या ती गुणगुणायला सुद्धा लागतो ."फुले वेचिता बहरू काळियासी आला", "इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी",काय सुंदर रचना खरच , आपले थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांच्याकडून शिष्यत्व प्राप्त झाल्यानंतरची हि अनुभूती कि ज्ञानेश्वर महाराजाना दिव्यत्वाची आलेली प्रचिती हा संतसाहित्याचा अभ्यास करणारे, विचारवंत,श्रेष्ठ भाष्यकार यांचा विषय ,माझ्यासारख्या सामान्याला मात्र ह्या काव्याची सुंदर रचना,स्वर,संगीत, स्वर्गीय अनुभूती देऊन जातात व हा मोगरा आपल्यासुद्धा जीवनात कसा भरलेला आहे,बहरलेला आहे याची कुठेतरी नक्कीच सुखद जाणीव करून देतात.
मोगरा ज्याचे जीवशास्त्रीय नाव
जॅस्मिनम सॅम्बक असून ओलिएसी
कुळातील जाई,चमेली,जुई यांच्या
हा जातकुळातील .(हे
अर्थात गुगल शास्त्र
!)प्रत्येकाच्या घरी-दारी
किंबहुना हृदयात घर करून
राहिलेल्या शुभ्र, निर्मळ मोगरा
ज्याला इंग्रजीत "अरेबियन लिली" असे
म्हणतात ,कधी सिंगल
,कधी डबल ,५-६ पाकळी
असलेला ,बट मोगरा
आदी स्वरूपात नेहमी
बघायला मिळतो.
तसा,फुलांचा राजा म्हणजे
"गुलाब"!पण, मला
मात्र भावतो पांढरा
शुभ्र ,अंतनिर्मळ असलेला , हिरवे
चुटुक देठ असलेला
आणि तेवढाच मंत्रमुग्ध
सुगंध देणारा मोगरा!
पावसाळ्यात किंवा एरवीही साधी
फांदी जरी जमिनीत
खुपसली तरी जगणारा,
सरळ साधा हा
मोगरा न कि
गुलाबासारखा राजेशाही थाट असलेला,अगदी बंडिंग
वगैरे करून जोपासलेला ,आणि मुख्य म्हणजे
राजे,महाराजे,श्रीमंत,यांच्या प्रसादात ,बागेत फुलणारा,थाटामाटात कौतुक करवून
घेणारा अनभिषिक्त "राजा"! अती
विशेषण नसलेला ,पण लग्नकार्यात वधू-वरांच्या
गळ्यात जरी गुलाबपुष्पांचा
भला मोठा हार
असला तरी वधूचा
शृंगार मात्र या फुलांच्या
गजरा-वेणीशिवाय अपूर्णच
असणारा!,पण अंतरंगी
जपणवूक केलेला ,मनभावन असलेला
,आपल्या सुगन्धाने आसमंत दरवळून
टाकणारा मोगराचं.
तसे माझे आयुष्य
फुलत गेलं या
मोगऱ्याच्याच सानिध्यात!आमचं दोन
मजली घर होत, “ग्रीनफिन्गर"असं काहीस
म्हणतात ते असण्याऱ्या
आमच्या पिताश्रींनी लावलेलं इवलेसे
रोपटे थेट तिसऱ्या
मजल्यापर्यंत पोहचलं , मोगऱ्याचा
वेल थेट गच्चीपर्यंत
व संपूर्ण गच्चीतच
पूर्ण ताकतीने बहरलेला राहायचा!मार्च ते मे
या महिन्यांमध्ये मोगरा
प्रचंड बहरायचा,काळ्याशार आकाशात
जस पांढरंशुभ्र चांदणे
लखलखते त्यागत हा हिरव्याकंच
पानांमधून खूप फुलायचा, बहरायचा! खरंच ज्ञानदेवांनी
वर्णन केल्यागत खाली
पडलेली फुल वेचता
वेचता कळ्या कधी बहरून यायच्या हे
हि कळत नसे.
तिच्या मनातील निर्मळपणा,वागण्यातील हिरवेपण,सरळ,साधा ,स्वभाव मोगऱ्यासारखच, शुभ्र रूप ,मला कधी भावल हे लक्षातच आलं नाही व "तो" मोगरा माझ्या हृदयावर कधी हिंदोळे घालू लागला हे केवळ त्या मोगऱ्याला आणि त्या वेलीलाच ठाऊक. पण एवढ मात्र खरं कि तिच्या सुगंधिरूपी येण्याने माझे मन बेधुंद झाले,त्या शुभ्रतेने जीवन सुखावले!
काहीतरी निमित्त काढून ती घरी यायची,मीही उत्साहाने भरभर गच्चीत जाऊन ,मधल्या माळावर चढून खुप-सारी परडीभर फुले तिला गोळा करून देताना, उमलत येण्याऱ्या टपोऱ्या कळ्या खुडून देता,देता कधी नकळत तिच्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही आणि मोगऱ्याच्या सुगंधासारखेच आयुष्यही सुगंधित झाले. ऐन वैशाख वणव्यात त्या मोहरलेल्या सुगंधी श्वासाने अंतरंगात पेटलेल्या दाहेला शीतलतेचा आभास नक्कीच होत होता. भरभरून बहरणाऱ्या मोगऱ्याच्या फुलासारखेच आमचे प्रेम मात्र बहरतच होते. आणि याचा एकमेव साक्षीदार मोगराचं.
म्हणून तर मला हा मोगरा आपलासा वाटतो ,लग्नाच्या आधीचे सगळी सुख,दुःख हितगुज याच तर मोगऱ्याच्या साक्षीने गुजगोष्टी करत राह्यच्या ,आयुष्यातील उमलत्या कळ्यांचा बहर याच वेळी मोगरा-फुलांनी अनुभवला होता.प्रेमासारखे देवाचं देणं लाभलं ते याच्या संगतीतच,मग का नसावा हा माझा जिवलग सखा?
लग्नानंतर मुंबईला असताना संध्यकाळी आफिसमधून येताना मोगऱ्याचा गजरा हमखास आणायचो, हिरव्या पानांच्या पुडित बांधलेला गजरा ती सर काही भरून काढू शकत नव्हता ,पण कुठेतरी मन मात्र जुन्या आठवणीत हमखास रमायचे ,आणि ते सुखद क्षण परत परत अनुभवायची नक्कीच अनुभूती देत राहायचे. आता संसार-रगाड्यात हे कुठे तरी विस्मृतीत गेल्यासारखे झाले आहे काळाच्या ओघात "ती"लांबसडक दोन वेण्या असणारी ,आणि बरेच वर्षे गजरा -वेणीला न्याय देणारी आता कालानुरूप,वयपरत्वे ,कालपरत्वे बदलली आहे तरी सुद्धा कार्यप्रसंगी उसने का होईना पण कृत्रिम केशसंभाराने जुन्या आठवणी जाग्या करायचा प्रयत्न करत असते, मीही तेव्हढाच मन:पटलावरील धूळ बाजूला सारून पूर्वीच्या आरश्यात डोकावण्याचा प्रयत्न करीत असतो.
असा हा जीवनरूपी मोगरा अजूनही तसाच फुलतो आहे,बहरतो आहे ,दिल्या घेतल्या वचनरूपी खतपाण्याचे यशस्वी रोपंण त्याचात झाले आहे ,त्यामुळे तो आजही आपले वचन त्याच फुलांप्रमाणे जपतो आहे ,आज आमच्या तीन मजली घरात मोगऱा वेल तसाच बहरलेला दिसतो आहे कुठेतरी आयुष्याची केलेली सुरवात, याच मोगऱ्याच्या साक्षीने पूर्णत्वास नेणारी हि एक संध्याकाळ ठरू पाहते आहे ,कायमच सदा साथ देणारा असा हा पांढरा शुभ्र,आल्हादायक ,सुगंधी मोगरा आयुष्यभर असाच सतत बरोबर असू दे हीच मन:पूर्वक इच्छा,आणि विध्यात्याकडे याचना!
120520 मोहरा




स्वानुभव??👌👌
उत्तर द्याहटवामोहरा चा मोगरा सुंदरच..
उत्तर द्याहटवा