रविवार, ३१ मे, २०२०

भैताड

                                                           !!  भैताड !!
                                     
                                          "माझ्या मराठीचा बोलू कवतिके परी अमृताते पैजा जिंके "! ज्ञानदेवांनी कितीतरी शतके आधी मराठीची महती सांगितली आहे, गोडवे गायली  आहे, पण इतक्या वर्षात मराठी भाषेत अनेक बदल हे काळाच्या ओघात झाले आहेत, कुठलेही बदल हे समृद्धीचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे मराठी भाषेतील बदलांनी भाषा समृद्ध करण्याचे काम इतक्या वर्षांनी नक्कीच केले आहे ,काळानुरूप मराठी भाषेमध्ये अनेक शब्द जोडल्या गेले,काही विस्मृतीत गेले,तर काही स्वरूप बदलवून  राहिले. स्वात्यंत्रवीर सावरकरांनी भाषा शुद्धीचा आग्रह धरून इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांना मराठी पर्यायी शब्द देऊन भाषेचे दालन अधिकच समृद्ध केले या विषयी कुठलीच शंका नसावी.
                                           असो, मराठी भाषा हि बोली भाषा म्हणून जरी एक असली तरी तिला भरपूर कंगोरे सुद्धा आहेत,अगदी पुस्तकी नागर भाषा, पुणेरी, बम्बईया , कोकणी ,कोल्हापुरी, खान्देशी,वऱ्हाडी इ. ढोबळमानाने त्याचे अनेक प्रकार करता येतील पण जिल्हा बदलला कि भाषा सुद्धा बदलते,दर मैलागणिक ती बदलत असते  किंवा त्यातील ठराविक शब्द हे त्या प्रांताकरिता ,जिल्ह्याकरिताच मर्यादित असतात .पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात वास्तव्याला गेल्यानंतर तिथल्या मुळ भाषेवर आपली विशिष्ट भाषा शैलीचा प्रभाव टाकण्यात काहीजण नक्कीच यशस्वी होतात व ते स्थानिक भाषा मात्र अधिक सम करण्याचे मह्तकार्य करत असतात.                                                                                
                                    विदर्भ म्हणटल ,कि वऱ्हाडी भाषा असं सर्व साधारण समीकरण !पण वऱ्हाडी भाषा हि मुख्यत्वे वर्धा,अकोला,यवतमाळ,अमरावती बुलढाणा इ. जिल्ह्यात जास्ती बोलल्या जाते.चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा इ. भागातस्थानिक भाषेवर शेजारील जिल्ह्यांचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवतो व स्थानिक भाषेतील शब्दांची सरळमिसळ त्यात झालेली दिसते. पण "नागपुरी"भाषा हि एकदम वेगळी थोडी वऱ्हाडी ,थोडी हिंदी,इथल्याच मूळ असलेल्या "सावजी"इ. भाषेची सरळमिसळ करून बनलेली एक वेगळीच बोली आणि त्यात सामावलेले शब्दही असेच अफलातून !जे कुठेच ऐकायला मिळत नाही .असाच एक वैशिष्टपूर्ण शब्द म्हणजे "भैताड"! तसा "भैताड" शब्द बाकी विदर्भात सुद्धा बह्याड ,भैताड म्हणून सर्रास वापरतात पण नागपूरकरांनी याला फारच अंगा-खांद्यावर खेळवले आहे व अगदी रोजच्या बोलण्यातील एक तो अनिवार्य शब्द झाला आहे. तुला काही समजत नाही,वेडपट ,मूर्ख, बावळट ,पागल या अर्थाने "बह्याड"या शब्दाचे नागपुरी व वैदर्भीय संस्करण म्हणजे "भैताड"!
                       हा "भैताड" शब्द नागपुरातील मराठी भाषिकांबरोबर हिंदी भाषिकांमध्ये सुद्धा चांगलाच प्रचलित झालेला दिसतो,व ते याचा वापर करताना सहज दिसतात. पागल है--------!,बरोबर,   भैताड  है........! असं हमखास ऐकायला मिळू लागले आहे. शाळा-कॉलेज मधील सर्व भाषिक मुलं -मुली "भैताड"चा उपयोग सर्रास करताना दिसतात ,कुठल्याही कॉलेज कट्ट्यावर, कॅंटीनमध्ये चार-चौघांच्या बोलण्यात खास नागपुरी "भैताड है क्या बे"..... अगदी सहज मुक्तपणे ,ऐकायला मिळते.
                             भाषेतील काही विशिष्ट शब्दांमुळे आपण, व्यक्तिविशेषणाचे  मूळ गाव कुठले असेल हे सहज ओळखतो. या बाबतीत असाच एक किस्सा माझ्याही बाबतीत घडला ,झाले असे कि एकदा सहकुटुंब रेल्वेनी मुंबईवरून येत असताना मराठीतील एका सुप्रसिद्ध कलाकाराचे आई,वडील,व पत्नी (ज्या सुप्रसिद्ध गायिका पण आहेत )आमचे सहप्रवासी म्हणून समोरच बसले होते. मुलगी लहान असल्याने वरच्या बर्थवर चढणे ,उतरणे,असे स्वाभाविक खेळ करून बंदिस्त जागेत स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करीत होती,स्वभाव धर्मानुसार व काळजीपोटी बायकोच मुलीला सारखं सूचना अर्थात प्रेमळपणे ,कारण आपण चार-चौघात बसलो आहे याची जाणीव व एसी ने प्रवास असल्याने "स्टॅण्डर्डायझेशन"  "मेन्टेन"करावं लागत म्हणूनसुद्धा ! पण लहान वयचं ते! ,कोणी म्हंटले कि जास्त मस्ती करायची ,लोकांना आपल्या लीला जास्तीत जास्त दाखवण्याचा बालसुलभ अट्टाहास,त्यामुळे तिचे हे खेळ थांबण्याऐवजी अजूनच जोरात चालू होते ,शेवटी कंटाळून आतापर्यंत सामोपचाराने बोलणाऱ्या बायकोचा खास "नागपुरी" बाणा आता मुलीला आवर घालायला काम करू लागला बोलता बोलता तिने “भैताड”पणा करू नको,तडफडशील,धडपडशील ! हे वाक्य उच्चारताच आतापर्यन्त आम्हाला "नाशिककर" समजण्याऱ्या आजीने अहो,तुम्ही नागपूरचे का ?असा प्रश्न केला ,आम्ही मूळ नागपूरकर हे तुम्ही कसे काय ओळखले,असे विचारताच आजी म्हणाल्या अहो,तुम्ही मुलीला "भैताड" म्हण्टल तेव्हाच माझ्या लक्षात आलं! नंतर आमची गप्पांची छान मैफिल जमली ,एकत्र जेवणात आमचं तर्रीवाल भोकराचं लोणचे ,लसणाची झणझणीत चटणी "भैताड" शब्दाप्रमाणे त्या सगळ्यांनी सहज पचवली तो भाग वेगळा ,पण ह्या एका शब्दाने आम्ही "नागपूरकर"नक्कीच आहोत हे "स्टॅम्पिंग"मात्र केले.
                                           मूळ वैदर्भीय असणाऱ्या अनेक कलावंतांनी पुणे-मुंबईत जाऊन नाटक,चित्रपट क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला !त्यातही सध्या "भैताड"हा आपला खास शब्द स्वतःची वेगळी ओळख करून देण्यात भारत गणेशपुरे सारखे कलाकार मात्र कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. "चला हवा येऊ द्या "ह्या अत्यंत गाजलेल्या विनोदी कार्यक्रमात भारत गणेशपुरेंचा "भैताड"शब्द खुपदा जोरदार पंच मारून जातो व हा शब्द मराठीत बऱ्यापैकी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात ठेवण्याचे काम व या शब्दाला प्रचलित करण्यात त्यांचे योगदान नाकारता येत नाही. तसेच बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेली मराठी मालिका (अजूनही बहुतेक बंद झाली नाही!) "माझ्या नवऱ्याची बायको"यात उगाचच विदर्भातील लोक सर्रास न बोलणारी भाषा "वैदर्भीय"म्हणून का दाखवत आहे हे एक न उलगडणारे कोडे. पण ते चूक  कि बरोबर या भानगडीत न पडता  त्यात वारंवार येणाऱ्या "भैताड" या शब्दामुळे हा "टिपिकल"वैदर्भीय शब्द आहे याची ओळख साऱ्या जगताला करून देण्यात मात्र हि मालिका यशस्वी झाली आहे व त्याला प्रेक्षकांचे पाठबळ मिळाले आहे हे तेवढेच सत्य हि आहे.
                              मूर्ख,बावळट वेडपट बेअक्कल, समजत नाही,पागल इ. शब्दांची लाखोली वाहून आपली शब्दसंपदा व वेळ घालवण्यापेक्षा या सगळ्या विशेषणाचे एकच सामायिक नाव म्हणजे "भैताड"!वेगवेगळे पदार्थ जसे दूध ,दही,पोहे,लोणचे डाळ, मिरच्या इ. एकत्र करून जो काला करतात न तसेच!यात कुठल्याही भक्तीचा उपमर्द करायचा या अर्थाने नाही पण सगळ्या पदार्थाचे एकत्रीकरण त्याची चव किंवा त्याचा "इम्पॅक्ट"जो काही बनतो न तसाच ह्या सगळ्या विशेषणांचा "इम्पॅक्ट"ह्या एकाच शब्दाने व्यक्त होतो हे याच वैशिष्ट्य !थोडक्यत काय तर एकाच अर्थाच्या विविध शब्दांची बनवलेली चविष्ट व खुमासदार  "शब्द-भेळ"म्हणजे "भैताड" शब्द!
                           
                                                                         
 
                              मराठी भाषेची किंबहुना एखाद्या शब्दाची व्याप्ती कशी वाढवावी व त्या शब्दाला व्यापक ,मोठे स्वरूप कसे द्यावे याबाबतीत आम्ही मराठी भाषिक फारच चोखंदळ व विचारपूर्वक आग्रही असतो तसेच एखाद्या शब्दाला विस्तृत अर्थाने कसे वापरावे याचे अनेक उदाहरण आपल्या रोजच्या बोलण्यातून आपण नेहमीच व्यक्त करत असतो.
                            आता हेच बघा ना, मूळ शब्द "भैताड"हा तसेही अनेक विशेषणांचे एकत्रिकरण  करून बनलेला शब्द पण त्याची व्याप्ती "भैताडपणा" ( मूर्खपणा ,बावळटपणा करण्याची प्रत्यक्ष कृती किंवा एखाद्या व्यक्तीची वेडेपणाचे कृती), "भैताडवाडा" (एखादी बावळटपणाची सामूहिक कृती किंवा सगळ्यांचाच मूर्खपणा या अर्थाने ),"भैताडपात्र" ( आधीच मर्कट त्यातही प्याला अशी स्थिती ,भैताडपणाचं मेष पात्र या अर्थाने ),  "भैताडवांग" (यात वांग्याला एवढं तुच्छ का समजायचे माहिती नाही पण "वांग्या"हि एक आदरार्थी शिवी प्रचलित आहे त्यावरून एखाद्याला प्रेमाने? बोलवणारे संबोधन!)           
         "भैताड बोंगाडी " (एका स्त्री व्यक्तिमत्वाने नेहमीच बावळटपणाची किती परिसीमा गाठावी या अर्थाने योजिलेले खास विशेषण ) "भयुं" ( अगदी खाजगीत नवरा -बायकोच्या प्रेमालापात ,लाडाने केलेले संबोधन! ) अश्या अनेक मूळ शब्दापासून तयार झालेले हे खास शब्द भाषेची समृद्धता करण्यात भरीव योगदान देत असतात,आणि यात वैदर्भीय कुठेच कमी पडत नाही हे विशेष!
                        तर असा आमचा वैशिष्ट्यपूर्ण शब्द "भैताड" म्हण्टले तर साधा, म्हंटल तर खूप गर्भितार्थ घेऊन मिरवणारा!पर्यायी शब्द याला भरपूर आहेत पण ह्या "भैताड"मुळे  माझी बोली,प्रांत ,गाव,याची न सांगता हि समजणारी ओळख देणारा व आता विदर्भ सोडून अनेकांच्या ओठावर सहज थिरकणारा भाषेचा "लहेजा"सांगणारा वैशिष्ट्यपूर्ण शब्द!
                     मला माहिती आहे अतिशय चोखंदळपणे कुठलीही गोष्ट पारखून घेणारे वैदर्भीय दर्दी काही "भैताडसारखे" लिहते बे हा "हे तोंडावर सुद्धा सांगायला कमी करणार नाही तो परखडपणा आमच्यात आहे,पण मी हि तेवढ्याच "भैताडपणे" हे लिहीतच राहणार-----------------------!

30052020                                                                                                                             - मोहरा
                                                               
                                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झंडू

                                               "झंडू"-बाम नाही एक विशेषण                                                   ...