“कुली” ...ह्याला जीवन ऐसे नाव......!
"कुली "म्हण्टल्याबरोबर डोळ्यासमोर उभा राहतो तो लाल डगलेवाला ,डोक्याला लाल मुंडासं गुंडाळलेला रेल्वे स्टेशन वरील "हमाल"!
तसा कुली हा मूळ शब्द इंग्लिश. मजूर,हमाल ,मजदूर या अर्थाने आपण सर्रास वापरतो, पण आमच्या नागपुरी भाषेत घराचे व इतर तत्सम बिगारी ,अनस्किलड काम करणाऱ्या पुरुषाला "कुली " व बाईला "रेजा" म्हणून संबोधल्या जाते.
माझं जीवनच रेल्वेशी निगडित असल्यामुळे कि काय मला कुली ह्या शब्दाबद्दल,त्या व्यक्तिमत्वाबद्दल एक विशेष आदर व जवळीक वाटण साहजिकच आहे ,जीवनाचा संघर्ष ते कसा कष्टाने,आंनदाने ,दुसऱ्यांचा भार हलका करून मजेत जगत असतात हे बघता त्यांचं कौतुक हि वाटते पण मन कुठेतरी हळवं सुद्धा होत आणि वाटत "ह्याला जीवन ऐसे नाव"!
यांच्या कपड्यांचा रंग लालच का? दुसरा कुठलाच का नाही ?याचा विचार करता असं लक्षात येत कि प्लॅटफॉर्म वरून कुठूनही लाल रंग सहज दिसतो ,पटकन नजरेत भरतो. तसा रक्ताचा,(मेहनीतीचा )क्रांतीचा ,कामगारांचा रंग लालच ,म्हणून पहिलेपासून हाच रंग असावा ,कामगार विश्वात या लाल रंगाला अन्यनसाधारण महत्व आहे ,पण अति राजकारणामुळे हा 'लाल' आता ओहटीला जाऊ लागला व त्याची जागा "भगवा"वादळरूपात घोंघावयाला सुरवात झाली आहे ,परंतु आजतागायत यांचा रंग मात्र लालच आहे जणू रेल्वेचे "लाल”,सुपुत्र असल्यागत!
आमच्या रेल्वेच्या भाषेत कुलींना "लगेज पोर्टर" किंवा "लायसन्स पोर्टर "म्हणून आम्ही संबोधतो,व तसा त्यांचा उल्लेख करतो. कुठेतरी कुली या शब्दाला न्याय द्यायला म्हणा किंवा मालक-नौकर या सरंजामी प्रवृत्तीतून बाहेर पडायला म्हणा,हे संबोधन सुटसुटीत व सोयीचे सुद्धा नक्कीच वाटत.
गीतेतील सुप्रसिद्ध वचन "योगक्षेम वह्यामहं "किंवा भारतीय जीवन विमा निगमनी आपले बोध वाक्य केले असल्यामुळे जास्तच लक्षात राहिलेले हे वचन, तू निश्चिंत राहा,कार्यकारित राहा तुझा योग , क्षेम,भार वाहून नेण्यास "मी" समर्थ आहे ,तसेच हा भारवाहक ,हमाल आपल्या सामानाचा भार स्वतःच्या डोक्यावर घेऊन आपल्याला निर्धास्तपणे चालायला सांगतो,आपला सगळा भार,ओझे स्वतःच्या अंगाखांद्यावर घेऊन आपली पोटाची खळगी भरायला का होईना पण एक प्रापंचिक परमार्थ साधत आपला "भार" स्वतः वहन करतो हे कुठेतरी मान्य करावेच लागेल. अर्थात हा व्यवसाय मजबुरीने,पोटापाण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेने त्यांच्यावरही "लादला"आहे हे तेवढेच सत्य!
तस कुली म्हणून कोणालाही उभं राहता येत नाही. दंडाला बांधलेला जाड पितळी नंबर असलेला बिल्ला हे त्यांचं "आय-कार्ड"! रेल्वे प्रशासनाकडून रीतसर नोंदणी झालेल्यानाच कुलीचा बिल्ला मिळतो. त्याकरिता त्यांच्याकडून वार्षिक वर्गणी (अर्थात अत्यंत अल्प)घेतल्या जाते,मेडिकल फिटनेस त्यांना लागत असते ,तरच ते "कुली" पदाकरिता पात्र असतात ,वडिलांचा बिल्ला मुलाला मिळतो पण सगळी पूर्तता झाल्यावरच. आता तर महिला कुलीपण दिसायला लागल्यात !जीवनाचा चारित्यार्थ चालवायला हा हि एक पर्याय म्हणून त्या या व्यवसायात पडल्या असाव्या पण आपल्या समाजव्यवस्थेचे विदारक चित्रण यातून प्रदर्शित होत असते असे सहज मनात आल्यावाचून राहात नाही.
अश्या या सगळ्या कुलींची आता संघटना आहे,कुठल्यातरी देशपातळीवरील संघटनेशी असंघटित कामगार म्हणून जोडल्या गेले आहेत.युनियनबाजीत जे सर्व प्रकार चालतात ते इथेही दिसू लागले आहेत,"पण संघटन मे शक्ती है "या उक्तीनुसार रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यायची त्यांची मागणी जरी अजून पूर्ण झाली नसली तरी वर्षातून एकदा संपूर्ण भारतात रेल्वेने फिरायचा "पास"मात्र संघटनेने पदरात पाडून घेतला आहे हेही नसे थोडके!
वास्तविक सामान वाहून न्यायचे दर प्रशासनाने जरी ठरवून दिले असले तरी "कुली" आणि "आपले" दर आपणच ठरवत असतो. स्टेशनवर पोहचल्यावर कुलींचं मोहोळ आपल्याभोवती जमा होते त्यातून आपल्याला एकाची निवड करावी लागते,घासाघीसीनंतरच सेटलमेंट झाल्यावर आपला भार आपण त्याच्या डोक्यावर घालून निश्चिंतपणे त्याच्या मागे ,अर्थात तो बराच समोर ओझे घेऊन सुद्धा आणि आपण लोकांना चुकवत,धक्के खात लांबून त्याला शोधायच्या नजरेने आपल्या बर्थ पर्यंत पोहचतो. तसेच ,गाडी प्लॅटफॉर्मला लागल्याबरोबर धावत जाऊन नेमका डबा पकडणे,किंवा डब्यात कोणाकडे किती सामान आहे ,कोणाला आपली गरज आहे हे घारीपेक्षाही तीक्ष्ण नजरेने टिपून आपल्या अनुभवाने,सरावाने हे लोक सहज शिकून नेमकं ते गिऱ्हाईक पटवायचं काम व्यवस्थित करतात. कुली,कुली आवाज देणारे प्रवासी ५०-१०० करता शेवटी पर्याय नसल्याने ,नाइलाजाने सामान कुलीच्या हवाली करून हात हालवत बाहेर पडतात. आम्हा, भारतीयांची मानसिकता फार विचित्र आहे,गरीब एखादा कामगार , भाजीवाला,मोची,रिक्षावाला,हमाल,कुली जितका गरीब ,मजबूर तितका आम्हाला त्यांच्याशी "भाव" करायला जास्तच चेव येतो,हॉटेलमध्ये १००-१२०चा डोसा किंवा ३००-५००चा पिझ्झा खाताना त्याची खरी किंमत किती याचा विचार करताना आमचा "घास"कुठेच अडकत नाही,मग येथेच आमचं अर्थकारण का आडवं येते हे कोड काही सुटत नाही.
गाडीतून उतरल्यावर सामान जास्त असल्यास,'गाडी अभि लेके आता हूं' म्हणून हे महाशय निघून तर जातात ,अर्थात आपलं गिर्हाईक कोणी पळवून नेऊ नये म्हणून तजवीज करूनच!आणि त्याचा "अभी "मात्र "कभी" येतो हे आपण चातकासारखी वाट बघत बसतो,पण येतात नक्की!
गाडीला यायला वेळ असला कि जागेवरून 'आया साहब 'म्हणून गायब होतात,आपण ठरवलेला कुली कुठे दिसतो का,हे मान उंच करीत प्लॅटफॉर्मच्या गर्दीत शोधताना मान पार मोडीत निघते व सगळे हमाल आपलाच वाटायला लागतो पण तो, "तो" नसतोच, आपल्या जीवाची प्रचंड घालमेल चालली असते,गाडी आपल्यासमोर येत असते ,मनोमन त्याचा नावानी शिव्या देत स्वतः सामान चढवायची मानसिक तयारी चालली असतानाच हे पुढ्यात दत्त म्हणून हजर !हे हि यांचं एक खास वैशिष्ट्य!
स्टेशनवर कुली फक्त सामानच चढ-उतार करतात असं नाही,पण इतर तत्सम काम करूनसुद्धा ते आपल्या व्यवसायात वृद्धी करत असतात किंवा मुख्य व्यवसायाला पूरक जोडधंदा जोरात चालू असतो. गाडी प्लॅटफॉर्मला येत असतानाच चालत्या गाडीत उडी मारून आपला लाल पटका टाकून अनारक्षित सीट रिझर्व्ह करण्याचे कसब यांच्या रक्तातच भिनल असते,तिथे त्यांची दादागिरी व रेल्वे पोलिसांशी सलगी "अर्थपूर्ण" व्यवहार करण्यात मश्गुल असतात. (आता मुंबई सारख्या ठिकाणी जनरल डब्याचे लॉक पोलिसांच्या उपस्थितीत उघडतात व लाईन लावूनच प्रवेश मिळतो )
प्रवाशांच्या दृष्टीने आदरणीय असलेला आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे काळे कोटवाले तिकीट तपासनीस ,टीसी ! काही जणांशी यांची सलगी, ऋणानुबंध फारच घट्ट असतात ,शिल्लक असलेले बर्थ ,जागा हि युती "गरजवंतांना"च वाटप करत असते!(कारण गरजवंताला अक्कल नसते )काळी-लाल युती कधी गरजेपोटी ,नाइलाजाने,पर्यायनसल्याने पांढरपेशा खिशातून काळा पैसा सहज खिशात टाकत असते. (सुदैवाने आता हे प्रमाण नगण्य झाले आहे.)
रिझर्वेशनच्या लाइनमध्ये उभे राहून आपली 'वट' प्रवाशाला दाखवून ,स्वतःवरचा त्याचा विश्वास अढळ करणाऱ्या लकबी करत ,शिकलेल्या माणसाचा फार्म स्वतःच भरून त्याच्या शिक्षणाचे वाभाडे काढत तिकीट काढून देणे किंवा तुफान गर्दीत जनरलच्या तिकिटाकरता विशेष मेहरबानी असलेल्या तिकीट बाबूंकडून बाजूनी उभं राहत जसे पूर्वी सिनेमाचे ब्लॅक तिकीट काढणारे असायचे आणि आपण रागारागाने पण कुठेतरी असाह्य असलेल्या भावनेने बघायचो तसेच तिकीट काढून पॅसेंजरला तिकीटासकट जागा मिळवून देण्याचं कौशल्य दाखवणारे बोटावर मोजण्याइतके कुली असतातच !त्याचं हे स्किल वर्क असत व त्याच्या परंपरांगत अनस्किल वर्क पासून हे सो-काल्ड व्हाइटकालर कुली आपले वेगळेपण टिकवून असतात.
प्रवाशांसाठी व्हीलचेअर प्रत्येक स्टेशनला उपलब्ध असते,व ती प्रवाशांचे आप्त-स्वकीय सहज वापरू शकतात पण काही कुली जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे इथेही आपली मक्तेदारी ठेवून असतात व त्याचे वंशपरंपरागत वाहक तेच असतात. स्टेशनवर प्रवाशांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठे कार्यालय असतात,ठराविक कुली त्या आफीसचे अनाफीशियल "आफिसबॉय "असतात,चहा-पाणी, खानपान व्यवस्था हि यांच्याकडेच लागली असते,कार्यालयीन कागदपत्रे, निरोप आदी फुटकर काम करण्यात यांचीच मदत असते,चार पैसेही सुटतात आणि ऋणानुबंधाच्या गाठीही घट्ट होऊन व्यवसायात बरकत आणायला हे संबंध पुरेसे असतात. शेवटी हे सर्व व्यवसायिक क्लुप्त्या या सदरात मोडणारे म्हणून क्षम्य समजायचे!
एक मात्र खरं ,कि बहुतेक कुली जमात हि सरळ, साधी,मेहनती असते. अर्थात अपवाद हे प्रत्येक ठिकाणी असतातच!धावतपळत गाडी पकडणाऱ्याला चालत्या गाडीत सामानासकट ढकलणारे बिना मोबदल्याचे काम करीत असतात.गाडी उभी असताना गाडी खाली गेलेलं सामान ,चप्पल,छत्री ,काठी इ .काढून प्रवाश्यांचा जीव हायसा करणार काम हि यांचंच. चालती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात गाडी खाली जाणार्याचा जीव वाचवायचे काम प्लॅटफॉर्मवर सतर्क असणारे रेल्वेचे हेच "शिपाई"करीत असतात. एखाद्या अपघाती प्रकरणात प्रशासनाला मृतदेह,किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला ऍम्ब्युलन्समध्ये टाकायचे काम पोलीस यांचा सहकार्याशिवाय करूच शकत नाही. हि यांची सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व मोठ्या आत्मीयतेने व सहजरित्या पार पाडत असतात,कुठल्याही फळाची अपेक्षा न करता हे यांचं अमूल्य योगदान नजरेत भरण्यासारखे आहे.
असा हा कुली रेल्वेचा चालत बोलता आत्मा आहे म्हणटलं तर वावगं ठरणार नाही,म्हणूनच फिल्मी दुनियेला पण यांचं आकर्षण सतत राहील आहे. 'कुली','कुली नं -१,इ. चित्रपट हिंदीत तर 'हमाल दे धमाल ' मराठीत बऱ्यापैकी "धंदा" या कुलींच्या जीवनपटावर आधारित राहूनच करू शकले. अमिताभच्या जीवनात जो दुर्दैवी प्रसंग उदभवला तो कुलीच्या चित्रीकरण्यादरम्यान त्यामुळे अमिताभचा कुली कायम प्रत्येकाच्या स्मरणात आहे. "सारी दुनिया का बोझ हम उठाते है "हे गाणं त्यांच्या जीवनातील वास्तविकतेचे कायमच दर्शन घडवीत असल्यामुळे रसिकांच्या चांगलेच लक्षात राहिले.
मराठमोळ्या लक्ष्मीकांतचा हमाल दे धमाल असाच अफलातून चित्रपट गाजला,मराठी कुलीचे जिवंत चित्रण यात प्रभावीपणे मांडण्यात आले होते.असो,पण या सगळ्या चित्रपटांमुळे कुलींकडे बघायचा दृष्टिकोन काही प्रमाणात तरी सकारात्मक झाला ,व हा पण आपल्यासारखाच मनुष्यप्राणी असल्याची जाणीव झाली हीच या चित्रपटांची फलश्रुती समजायची .
कुणी कुठलं सामान उचलायचं ,कुठला डब्बा कुणाचा,कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचे हे यांचं सगळं अलिखीतच असते त्यामुळे व्यवसायावरून हाणामारीचे कवचितच प्रसंग उदभवताना दिसतात व दिवसभर हे उत्तमरीतीने कार्यरत दिसतात.
आपला संपूर्ण भार दुसऱ्याच्या खांद्यावर ,डोक्यावर सोपवून आपण निर्धास्तपणे खाली हात ऐटीत चालण्याचा मोठेपणा हे कुली आपल्याला देत असतात परंतु,सध्या दोन चाक,चार चाक,असणाऱ्या मोठ्या-मोठ्या लगेज बॅग्समुळे कुलींच्या धंद्यावरपण विपरीत परिणाम झालेला दिसतो आहे,एस्केलेटर,बॅटरीवर चालण्याऱ्या गाड्या,कार ते कोच संकल्पना आदी बाबींची प्रवाशांची चांगलीच सुखकर सोय झाली आहे पण याची दुसरी तेवढीच वास्तविक बाजू म्हणजे हातावर पोट असणाऱ्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी कमी झाला आहे,त्यांना कुठेतरी ग्रहण लागले आहे ,नवनवीन सुविधा त्यांच्या जीवावर उठणाऱ्या साबित होत आहेत ,या करीता प्रशासनाने त्यांना कुठेतरी सामावून घ्यावे ह्यासाठी संघटना प्रयत्नशील आहेत पण यश मात्र कोसो दूरच आहे! त्यांना विश्रांती कक्ष ,जेवण्यासाठी जागा,मेडिकल सवलत हे कागदोपत्रीच आहे प्रत्यक्ष चित्र विदारकच आहे आणि तेवढेच शाश्वत सत्यही!
" कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे"हे बिरुद या जमातीला अगदी फिट्ट बसते. आपल्या आयुष्याचा भारसुद्धा असा सहज कोणावर टाकता आला असता तर........!कल्पनाच सुखावह असली तरी जो हा भार वाहणारा आहे त्यांचा विचार करता हे किती कष्टिक व सोशिक आहे हे या लोकांकडे बघूनच कळते,आपणही आपला भार या जीवनप्रसंगात सहजपणे दुसऱ्यावर ढकलत असतो,मग ते सहकारी,आई-वडील ,पत्नी कुणीही असो ,त्यांच्या दृष्टिकोनातून आपण विचारच करत नाही!अ, त्यात कायमोठं ?चलता है ,अशी आपली बेफिकीर प्रवृत्ती व सहज धारणा असते पण हा "भार"वहन करताना समोरच्याच्या त्रासाची,कष्टाची थोडीशी जरी किंमत करता आली,किंबहुना त्याचे मोल जाणायचा आपण थोडा जरी प्रयत्न केला तरी ती कोणाच्या तरी ऋणातून थोडीतरी मुक्ती मिळायची घटना नक्कीच ठरेल. स्टेशनवरील कुली हा दुसऱ्यांच्या जीवनाचा भार वाहणाऱ्याला कुठेतरी समजून घ्या,हेच आक्रंदन करीत असावा असं सारखं राहून -राहून वाटत असत. जीवनाचं सत्य आपल्या रोजच्या जीवनप्रसंगातून उलगडून दाखवणाऱ्या या लाल डगलेवाल्याला ,भारवाहकाला मनापासून सलाम!
२२०३२० -मोहरा
१
१




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा