सोमवार, २२ जून, २०२०

सावजी- एक चव

                                                   “सावजी”
                                                   

                                        .               
                                         
                                            महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती अतिशय विविधतेने , व वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हेने नटलेली आहे. कोकणी-मालवणी ,पुणेरी, खान्देशी, कोल्हापुरी ,वऱ्हाडी  इ. ढोबळमानाने आपण त्याचे विश्लेषण करतो. प्रत्येक प्रांताची खाद्यसंस्कृती आपआपलं वैशिष्ट्य घेऊन जगणारी व कळतनकळत त्या प्रदेशाचं त्यावर "स्टॅम्पिंग "सुद्धा झालेलं असते, खाद्यप्रकारांची इतकी विविधता खचितच कुठल्यातरी प्रांतात आढळून येते,इतकं आपली महाराष्ट्रयीन संस्कृती खाद्य क्षेत्रात विविधरंगाने  फुलली आहे व समृद्ध सुद्धा झाली आहे. 
                                           विदर्भातल्या वऱ्हाडी संस्कृतीत अनेक खाद्यप्रकार आपले वैशिष्ट्य टिकवून ते या प्रांतातील म्हणून जरी ओळखल्या गेले आहेत तरी त्यात "सावजी"खाद्यप्रकार आपले स्थान बऱ्याच वरच्या पातळीवर उंची गाठून आहे ,व तो वऱ्हाडी खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य अंग म्हणून चांगलाच यशस्वी झालेला दिसतो. झणझणीत ,मसालेदार ,खमंग खाणे म्हणजे"सावजी"!
                                          मुळात सावजी हि एक विशिष्ट जात !विणकर, किंवा हलबा कोष्टी समाज म्हणजे सावजी. मुख्यत्वे ,मध्यप्रदेशातून स्थलांतरित झालेले हे लोक ,त्याकाळी नागपुरात असलेल्या एम्प्रेस मिल व इतर मिल मध्ये कामगार म्हणून कामाला लागलेत, काहीजण हातमाग ,यंत्रमागावर स्वतंत्र व्यवसाय करून विदर्भात यांनी बऱ्यापैकी जम बसवला.काही परप्रांतात सुद्धा गेलेत, मध्ये येवला इथे जाणे झाले असता काही लोकांनी आम्ही मूळ नागपूरकर आहोत असे आवर्जून सांगितले. विदर्भ प्रांतात केंद्र व राज्य सरकारी नौकरीत यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे, हे उल्लेखनीय. महादेवावर निस्सीम भक्ती असलेला हा समाज कष्टकरी,प्रामाणिक म्हणून नागपूर व आजूबाजूला स्थान करून राहिला. यांची भाषा मराठीच पण त्यात हिंदी,गोंडी  मारवाडी किंवा गुजराथी(असा माझा अंदाज!)  भाषेची सरमिसळ करून स्वतःची स्वतंत्र बोली भाषा विकसित केली .ती भाषा व त्यांची विशेष प्रकारची खाद्य पद्धती यामुळे "सावजी"खव्वयांची लाडकी चव ठरली व त्याला मान्यता मिळाली . 
                                        विदर्भात कुठल्याही शहरात फिरताना सावजी खानावळ, सावजी हॉटेल ,सावजी घरगुती भोजनालय अश्या पाट्या सहज दिसतात . अत्यंत झणझणीत ,मसालेदार ,चमचमीत ,ज्याला सवय नाही त्याच्या नाकातोंडातुन पाणी काढणारं ,कानातून वाफारे सोडणारे पण तितकाच स्वादिष्ट चविष्ट रुचकर खाद्य प्रकार म्हणजे सावजी खाणे. म्हणून तर आम्ही म्हणतो चवीने खाणार त्याला सावजी देणार!
                                      सावजी खाणं मुख्यत्वे करून जवसाच्या तेलात बनवतात पण हल्ली लोकांच्या मागणीनुसार शेंगदाणा किंवा पाम तेलातही  बनवल्या जाते, पण जवसाची फोडणी जी अनुभूती देते त्याची सर दुसऱ्या कुठल्याही तेलाला येत नाही एवढं मात्र खरं.ह्याचा मसाला कुठला हे अजूनही "गोपनीय" असल्यामुळे बाजारात मिळणारा सावजी मसाला किंवा नकली सावजी कडे तयार होणारी "डिश"हि मूळ सावजींच्या कुठल्याच पातळीवर यशस्वी ठरत नाही हे आवर्जून सांगावेच लागेल. कमीतकमी २५-३० प्रकारचे मसाल्यांचे प्रकार वापरून केलेला मसाला,कांदा ,आलं, लसूण इ .ची पेस्ट वापरून जवसाच्या तेलात दिलेली फोडणी ज्यात तेलाचे पाण्यासारखे असलेले प्रमाण काळा किंवा लालसर काळा रंगाचा असलेला तवंगा सारखा रस्सा पाहताच मिळमिळीत खाणाऱ्यांच्या पोटात बघूनच पोटात गोळा उठतो पण असली डिश पुढ्यात येताच ,जीव कासावीस होणारे ,त्यावर तुटून पडणारे सावजी प्रेमी बघितले कि आपल्याला आपला जन्म व्यर्थ तर नाही ना अशी शंका येऊन घाबरत घाबरत खाण चालू केलं कि लक्षात येत अरे,हे दिसते तस अजिबात नाही व आपण  खाताना आपल मन कधी डोलायला लागते,आणि लगेच सावजीच्या प्रेमात पडून त्याला आपलस करित
 कळात- नकळत कधी  सावजी भक्त होतो हे कळतच नाही इतकी किमया हा प्रकार आपल्या बाबतीत करतो हे स्वानुभव व बरेच लोक सांगतात.
                                                                           
                                   मुख्यतः सावजी म्हणजे जास्ती तर नॉनव्हेज खाण ! अर्थात शाकाहारी लोकांसाठी पण अनेक प्रकार आहेत,सावजी मध्ये नॉनव्हेज अतिशय चवीने खाणारे खव्वये आपल्याला सहज दिसतात चिकन अर्थात गावठी,मटण ,अंडाकरी फिश,झिंगे हे नेहमीचे प्रकार याशिवाय सुंदरी (बकऱ्याच्या आतड्यापासून बनवलेले) खिमा ,कलेजी ,मुंडी,भेजा,खूर (पाया) असे अनेक अफलातून प्रकार खाणाऱ्याच्या जिभेवर रेंगाळत असतात ह्या खाण्याच्या नुसत्या कल्पनेने अंगावर शहारे येतात,खाण्याच स्वर्गीय तारांकित सुख काय असत याचा आपण अंदाज लावू शकतो.  सर्वच काही नॉनव्हेज खाणारे नाहीत त्यामुळे खास शाकाहारी लोकांसाठी हिरव्या वांग्याची भाजी, डाळ-कांदा ,खसखसची भाजी, पाटोडी रस्सा, पनीर, गवार, शेवभाजी ,पोपटाची उसळ इ. प्रकारचा "चॉइस"असतोच. त्यामुळेच सावजी खाताना व्हेज,नॉनव्हेज अशी कोणाचीही  पंचाईत होत नाही व खाण्यासाठीच जन्म आपुला या युक्तीने सगळेच "सावजींचा"मस्त आस्वाद घेतात. या जेवण्यातला अजून एक छान प्रकार म्हणजे "लसणी भात "भात फ्राय करून त्यात लालसर तळलेला लसूण मुक्त हस्ताने टाकून बनवलेला हा भात खूपच वैशिष्ट्यपूर्ण चवीला लागतो ,त्याच्यावर नुसतं लिंबू-मीठ जरी टाकून खाल्ला तरी एक अवर्णनीय चवीची अनुभूती मिळते,असा हा लसणी भात सावजी खाण्यातला एक अपरिहार्य अंग मात्र नक्की  आहेच.
                                    सावजी प्रकार आता सगळीकडे मिळतो, छोट्या-मोठ्या हॉटेल मध्ये ,ढाब्यांवर एवढंच काय अगदी थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा २-३ भाज्या या आवर्जून सावजी प्रकारच्या असतात,पण ती "मूळ" चव मात्र ठराविकच लोकांकडे मिळते. नागपूरला गोळीबार चौक ,जागनाथ  बुधवारी,गांधीबाग ,टेलिफोन एक्सचेंज चौक हि खास "ऍथेन्टिक"सावजी मिळायची ठिकाण ,तशी प्रत्येक एरीयातच काही धाबे,खानावळी आपलं नाव अजूनही टिकवून आहेत आणि साहजिकच दर्दी लोकांची तिथे नेहमीच वर्दळ असते.
                                                                               
                                  सावजी खाण्याची खरी मजा व एकदम अस्सल खायचे असल्यास त्यांच्या भागात, विशिष्ट खानावळीत जायचं, साधारण जागा, लाकडी टेबल -बेंच अर्थात खड्डे पडलेले व घरीच निळ्या-हिरव्या रंगाच्या पेंट ने रंगवलेले ,त्यावर बसायची व्यवस्था! बरोबर "आपला स्टाॅक" किंवा "चपटी"असल्यास त्यांची काहीच हरकत नसते,बहुतांश सावजींकडे काही अपवाद सोडल्यास हि सोय गिऱ्हाइकांचे व्यापक हित लक्षात घेऊन,त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून,पूर्णतः  कानाडोळा करून ,प्रशासनाची आर्थिक संबंध मधुर ठेवून विशेष परवानगीने  राजरोसपणे सुरु असते त्यामुळे गिर्हाईक येथे तेवढ्याच हक्काने व बिनधास्तपणे आपला घसा सहज "ओला"करून परमानंदाची अनुभूती घ्यायला बक्कळ गर्दी करतात   
                                 
                               सावजी जेवणाचं आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गरम -गरम फुलके,पोळ्या . कुठल्याही सावजीकडे हे तुम्हाला सहज बघायला मिळते,हल्ली ज्वारीची ,बाजरीची भाकरी पण "ऑन डिमांड"मिळते पण गरम पोळ्या अगदी घरच्या मायेने वाढल्या  जातात हे महत्वाचे. काही घरगुती खानावळीत जागा फुल्ल असल्यास किंवा तुम्ही सहकुटुंब गेल्यास चुलीच्या बाजूला पाट मांडून तुमची सोय अगत्याने केली जाते व पोळ्या करणारी माउली गरम पोळ्या वाढून आपली क्षुधा शांती सहजरित्या करून धन्यता मानते.
                              बहुतांश ठिकाणी सावजी भाजी प्लेट प्रमाणेच मिळते पण गरम पोळ्या व भात मात्र "अनलिमिटेड"असतो त्या मुळे मोठ्या हॉटेलमध्ये दर बघत जेवण्याची इथे गरजच नसते ,मेन्यू कार्ड हि असतेच असे नाही  दर-पत्रक मोठया अक्षरात टांगलेले आपल्याला सहज दिसते मग तुम्ही कुठल्याही टेबलावर बसा. तुडुंब जेवा,पोटभर जेवा हा संदेश देणारं जेवण हे सावजींचेच.
                              आता सावजी हा ब्रँड झाला आहे . आमचंच सावजी हे अस्सल अशी होड लागलेली दिसते आहे ,बाहेरून येणारे ह्याला सहज भुलतात ,काहीतरी तिखट-जाळ सावजींच्या नावावर खपवून दुसऱ्यादिवशीही त्याची "आठवण"येईल याची तजवीज करणार जेवण खायला घालून कळत -नकळत अस्सल सावजींची बदनामी करायचं काम करत असतात पण चोखंदळ खवय्ये "अस्सल"ते बरोबर शोधून काढून सावजींचा अमर्याद आनंद लुटतात व तृप्त होतात . अस्सल सावजींचा रस्सा आपण सहज पिऊ शकतो,त्याची एकदा चव कळली कि खर- खोटं पटकन लक्षात येत.
                     काही ठराविक सावजींची खूप चालती आपल्याला बघायला मिळते ,लांबून,परगावावरून सुद्धा सावजींच्या शोधात येणाऱ्यांची कमी नाही,माझ्या पुतण्या व त्याचे मित्र ,असे अनेक खवय्ये आपल्या वास्तव्यातील काही दिवस सावजी करताच राखून ठेवतात व त्या जेवणाचा आनंद घेतात. आपल्या तळपत्या जिभेला मात्र पर्वणी देण्याच काम करत असतात. नागपूरपासून ४०किलोमीटर लांब असलेलं उमरेड मधील काही सावजी महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात प्रसिद्ध आहेत.तिथे सावजी जे खातात त्यांची खाताना ब्रम्हानंदी टाळी नक्कीच लागत असते व आपण स्वर्गीय खात असल्याची जाणीव मेंदूच्या शेवटल्या कोपरयात होत असते. तिथून मुंबई ,पुणे सारख्या ठिकाणी विमानाने पार्सल नेणारेही काही कमी नाहीत,उमरेड मधील सावजी हे शेजारीच असण्याऱ्या भिवापुरी मिरचीच्या सानिध्याने जरा जास्तच "ठसकेबाज' झाले असावेत म्हणूनज तर एवढे लोकप्रिय झाले आहेत.
                                                                           
                          मुंबई -पुण्या सारख्या ठिकाणी नागपुरातील काही प्रसिद्ध शेफ "सावजी फेस्टिवल "चे आयोजन करून याची ख्याती सर्वदूर पोहचवण्याचे महत्कार्य करीत आहेत. नागपूरला आलं कि सावजी खाल्ल्याशिवाय जायचेच नाही असा संकल्प करून येणारे आता बरेच दिसत आहेत. अधिवेशन काळात सगळेच सावजी तुडुंब भरलेले नेहमीच दिसतात ,हया सगळ्या  जरी सकारात्मक बाजू असल्या तरी कुठेतरी सावजींचा अस्सलपणा नाहीसा झालेला दिसतो आहे अतिशय तिखट म्हणजे सावजी असं समीकरण स्वतःचा फायदा करून घेणारे सावजींच्या नावावर करताना दिसत आहेत हि खरच चिंतेची बाब ठरते आहे. ती "चव"कुठेतरी लुप्त तर होणार नाही ना?अशी शंका मनाला चाटून जाते ,पण चवीने खाणारे दर्दी खवय्ये आहेत तो पर्यंत ह्याला कोणी धक्का लावणार नाही हा आशावाद पण तेवढाच प्रबळ वाटतो. मध्यंतरी, सावजी प्रकाराला जीआय टॅग मिळावा म्हणून काही जण प्रयन्तशील असल्याचे वाचनात आलं होत.
                           आजच्या व्यापारीकरण्याच्या व धंदेवाईक जगताच्या दलदलीत हि "मूळ व अस्सल" सावजी चव कुठे नाहीशी होऊ नये ,एक उत्तम मसालेदार ,झणझणीत ,चमचमीत प्रकार आम्हा खवय्यांच्या जिभेवर सतत रेंगाळताना त्याच महत्व तेवढेच अबाधित राहावे हीच सगळ्या "सावजी प्रेमींची' मनापासून इच्छा नक्कीच आहे.

                                                                               


21-06-2020                                                                                                                      ---मोहरा
                                                                                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झंडू

                                               "झंडू"-बाम नाही एक विशेषण                                                   ...