“भोवरा”
रम्य ते बालपण !बालपणीचा काळ सुखाचा!असं म्हण्टल्या जाते न ते शब्दशः खरंही आहे. आमच्या बालपणात आजच्या सारखे मोबाइल, काम्पुटर,व्हिडीओ गेम्स इ. काहीच नव्हते,पण बालपण अगदी हवं हवंस वाटणारे व खूप मजेत गेले ते तेव्हा असलेल्या सगळ्या खेळांनी,अगदी झपाटल्यागत आम्ही त्या खेळांच्या आहारी पूर्णतः गेलो होतो किंवा ते खेळच आमचं आयुष्य व जीवनाचं एक अविभाज्य अंग बनले होते एवढं मात्र नक्की!
कंचे, भोवरे,गिल्ली-दांडू ,रेषटीप ,डब्बा -ऐसपैस ,रिंग,टायर चालवणे ,सूर-काडी,सळाख खुपसणे इ. खेळ शाळा कधी सुटते व खेळायला कधी पळतो अश्यागत आम्हा सर्वांची अवस्था व्हायची.
अश्यातलाच एक माझा आवडता खेळ म्हणजे "भोवरा" तसा, चालवायला ,खेळायला थोडा उशिराच लागलो कारण ते तस माझ्या दृष्टीने कठीण प्रकरण होते,पण एकदा जमायला लागल्यावर मात्र त्याने पुरते वेड लावले व एखाद्या सराईतासारखा मी सुद्धा भोवरा डाव्या हातात पकडून त्यावर उजव्या हाताने जाळी गुंडाळून फिरवायला शिकलो व झटक्याने हवेत फेकून हातावर घेण्याचे कसब उत्तमरीत्या आत्मसात करून घेतले.
लाकडाचा असणारा,शंकाकृती आकार असलेला हा प्रकार तसा अवघडच,त्याला खाली असणारी "आरू "(लोखण्डी निमुळते टोक ) व गुंडाळायला "जाळी"(जाड दोरी ) ती गुंडाळून हाताला विशिष्ट झटका मारून जाळी हातात ओढली कि भोवऱ्याची चक्राकार गिरकी मस्त यायची व तो फिरत राहायचा. आमचे प्रायमरीतले मास्तर (अर्थात लहान गावातले )भूगोल शिकवताना पृथ्वीची माहिती भोवऱ्याचे उदाहरण देऊन छान शिकवायचे कारण बहुसंख्य विद्यार्थी कंचे,भोवरे यांचे परम भक्त होते,बरेचदा मास्तरांचा मूड खराब असला कि अचानक दफ्तर तपासणी व्हायची आणि मोठ्या प्रमाणात कंचे,भोवरे आदी तत्सम खजिना हेडमास्तर दरबारी जमा व्हायचा ,हेडमास्तर हा खजिना आपल्या मुलांच्या झोळीत नक्कीच टाकत असावे हा बालसुलभ वयाला पडलेला प्रश्न !मी मात्र या सगळ्यापासून जरा लांबच राहायचो कुठेतरी त्याला असलेल्या अणूकचीदार टोकाची भीती दुसरं काय?
इंग्रजी वर्णमालेच्या पुस्तकात किंवा शाळेतील वर्गाच्या भिंतीवर लटकलेल्या "चार्ट"मध्ये "T" फार टॉप म्हणजे भोवरा असं शिकवायचे ,भोवऱ्याची हातात न घेता हि पहिली ओळख !नंतर आयुष्यतील वादळात असे अनेक भोवरे अनुभवायला मिळाले पण त्याच्या जाळीचा कंट्रोल आपल्या हातात असल्यामुळे कि काय त्या कुठल्याच भोवऱ्यात न अडकता आयुष्याची वाटचाल सुरु आहे.
पूर्वी फक्त लाकडाचेच भोवरे मिळायचे नंतर एखाद्या जत्रेत, यात्रेत प्लॅस्टिकचे भोवरे पण बघायला मिळायचे,आता हल्ली फायबरचे पण मिळतात म्हणे,पण लाकडाचा भोवरा फिरवण्यात जी मजा आणि "स्किल" आहे न ते दुसऱ्या कशात नक्कीच नाही.
भोवरा फिरवणे ,खेळणं हा म्हणटल तर एकट्याने किंवा सामूहिकरीत्या खेळण्याचा खेळ. फार थोड्या खेळांना हे भाग्य प्राप्त झाले आहे. अगदी एकलकोंड्या ( घरकोंबड्या! )मुलाला सुद्धा हा खेळ सहज खेळवतो. मुख्यत्वे हा खेळ म्हणजे मुलांचीच मक्तेदारी,मुली फारश्या ह्याच्या वाटेला जात नसत पण एखादवेळी एखादी जेव्हा शिताफीने फिरवायची तेव्हा खरंच कौतुक वाटायचे,याच मुली नंतर संसारात नवरा नामक विशेषणाला गर-गर फिरवून जेरीस आणतात व लहानपणी भोवरा न फिरवल्याचे उट्टे सहज काढतात असे कुठेतरी उगाचच वाटते.
रिंगणात भोवरे ठेऊन त्यांना बाहेर काढणे ,भोवरे एकत्र फिरवून जो आधी थांबला तो हरला या पद्धतीचे खेळ आम्ही खेळायचो,जो हरला त्याच्या भोवऱ्यावर आपल्या भोवऱ्याच्या "आरूने" "गुच्ची" मारायची तसा थोडा अघोरी प्रकार पण हरल्यानंतरची शिक्षा त्या भोवऱ्याला अश्या स्वरूपात मिळायची ,त्याकरिता प्रत्येक जण आरू जास्तीतजास्त टोकदार ठेवायचा प्रयत्न करायचा ,हरलेल्या मित्राच्या भोवराला गुच्ची मारताना समोरच्याचा भोवरा पुरता विद्रुप करून टाकायचा,काही दिवसांनी तो अगदी देवीचे व्रण झालेल्या चेहऱ्यागत दिसायचा,प्रसंगी त्याचे दोन तुकडेही व्हायचे पण हे करताना एक "आसुरी आनंद " प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकायचा !हा आनंद जरी आसुरी वाटत असला तरी तेव्हा तो जिंकलेल्या योध्याचे समाधान कुठेतरी देऊन जायचा व जेतेपणाची ख़ुशी नकळत चेहऱ्यावर दिसायची. पण खेळाडूला कुठलीच शिक्षा न देता,त्याच्या वस्तूला देणं हे खिलाडूवृत्तीची व औदार्याची जाणीव करून देणारी तेवढीच महत्वाची !
या भोवऱ्याचा एक "स्किल"असलेला प्रकार म्हणजे भोवरा हवेत फिरवून उसळी घेत तळहातावर घ्यायचा व फिरवायचा काहींना सहजच जमणारा तर काहींना प्रयत्नांती परमेश्वर गाठण्यासारखा!जमिनीवर फिरत असलेला भोवरा अलगद तळहातावर घेण्याचं कसबही याच पठडीतील पण ही मक्तेदारी असणारे मात्र ठराविकच. हाच भोवरा जाळीने तळ हातावर अलगद ओढून घ्यायचं दिव्य काम करणारेही काही कमी नव्हते.
भोवऱ्यात विशेष रुची असणारे किंवा आम्ही ज्यांना टारगट ,व्रात्य समजायचो असे दर्दी महाभाग दोन आरुवाला भोवरा बाळगण्याचे सामर्थ्य दाखवायचे अर्थात त्यांच्या वाटयाला चुकूनही न जाता आम्ही मात्र आपले हित बघून सरळ वाटेनेच जायचो.
भोवरा शब्द उच्चारताना "भवरा" असा केल्या जातो,पण हा भवरा म्हणजे हिंदीत भ्रमर !मधुकर वण वण करीत गुंजारवाला करणारा भ्रमर,स्वतःला भवऱ्याची उपमा देऊन प्रेयसीच्या मागे फिरणारा ,नादान,वेडापिसा,भवरा!एका "ओ"ची मात्र कमी जास्त झाली कि शब्दामध्ये ,भाषेमध्ये किती फरक पडतो नाही?असो,मात्र भोवऱ्याला हिंदीत लट्टू म्हणतात,का म्हणतात हे हिंदी भाषाशास्त्रज्ञच सांगू शकतील पण बालपणात आपण या भोवऱ्यावर शब्दशः “लट्टू" झाले होतो हे तेवढेच खरे!
आपलं आयुष्यही तस या भोवऱ्यासारखच आहे,आयुष्याची "आरू "व्यस्थित असेल तर हा भोवरा योग्यरीत्या जाळीच्या साह्याने फिरत राहणार जर जाळी योग्यरीत्या न बसवता ,भोवरा फिरवला तर तो आरुवर न फिरता तसाच आडवा फिरतो अशीच आपल्या आयुष्याची फटफजिती झाल्यावर बघायला तत्पर समाजमन टपलेलेच असते!
भोवरा उलटा फिरवणं हे सुद्धा एक कसब आहे. ज्या आरुमुळे भोवऱ्याचा डोलारा पेलल्या जातो ,त्याच आरुला आकाशाकडे बघायला लावून ,डौलात भोवरा उलटा फिरवणे म्हणजे दैवाचे फासे कितीही उलटे पडले तरी फिरण्याची क्रिया म्हणजे आयुष्य विपरीत परिस्थितीतही ढळू न देता मार्ग काढण्याची कला आत्मसात करण्यासारखे आहे,हेच याच्यातून शिकायला मिळते.
सुरवातीला भोवरा या क्षेत्रातील दादा लोक भोवरा जर फिरवता नसेल येत तर "बायल्या हाताने"फिरवायला सांगायचे म्हणजे अंडर आर्म करून खचका ओढल्यागत जाळी आपल्याकडे ओढायची,पण याला "बायल्या" का म्हणायचे हे मला आजगायत कळले नाही पण त्यातही भोवरा फिरायचा उत्तमच !उगाचच माझ्यातला स्त्री मुक्तीवादाचा विचार तेव्हा नाही पण आता जोरात उचंबळून आला हे नक्की!
गोल-गोल येणाऱ्या चक्रीवादळाला पण आपण भोवराच म्हणतो,दुरून ते दिसताच आपण त्याच्यापासून बचाव करतो,मला अजूनही अपूर्ण राहिलेली बालसुलभ इच्छा म्हणजे त्याच्यात उभं राहून आपण गोल फिरतो का हे बघायचं होत! आपल्याबरोबर धूळ ,कागद,कचरा सामावत फिरणार ते चक्रीवादळ "भोवरा"मात्र निसर्गाचं आगळ-वेगळं रूप दाखवत असतो.
असाच एक “भोवरा” नदीपात्रात असणारा!असतो का खरच कि कपोकल्पित गोष्ट,माहिती नाही ,कधी अनुभवला नाही परंतु नदीत उतरताना तिकडे जाऊ नको तिथं भोवरा आहे म्हणून काठावरून काळजीयुक्त सूचना मात्र मिळत असतात,आणि त्या भोवऱ्यामुळे अनेकांचे प्राण पण गेलेले सुद्धा कळत असतात. थोडक्यात काय तर निसर्गाच्या भोवऱ्यात आपण कधी अडकू नये तो आपली दुर्दशाच करतो,तसच कुठ्ल्याच मोहरूपी भोवऱ्यापासून न अडकता आयुष्याची वाटचाल करावी हाच बोध निसर्गाकडून आपण शिकला पाहीजे
असाच अजून एक पूर्णतः काल्पनिक (कारण मी विज्ञानवादी! )भोवरा अर्थात "चकवा"बरेच जण याला भोवरा पण म्हणतात! लहान खेडेगावात हा नेहमी चर्चेत असणारा भीतीदायक प्रचलित शब्द व त्याचा हमखास अनुभव घेणारे भेटतातसुद्धा! हा एकदा मागे लागला कि माणूस फिरतच बसतो भोवऱ्यासारखा!जो पर्यंत कोणी हटकत नाही तो पर्यंत! खर का, खोटं, देवच जाणे पण खेळण्यातल्या भोवऱ्यासारखाच हा फिरायला लावणारा म्हणून "भोवरा"!
लहानपणी आपले सवंगडी आपल्या डोक्यावर किती भोवरे आहेत हे बघायचे. दोन भोवरे म्हणजे तुला दोन बायका मिळतील असे ठासून सांगायचे ऐकून कुठे तरी मजा वाटायची,मलाही दोन भोवरे होते पण एकच बायको मोठ्या नशिबाने मिळाली ,दुसरीचा तर विचारही करू शकत नाही तेव्हा हे किती सहज म्हणून जायचे हे आठवले कि बालपण किती निरागस असते हे पटायला लागते. असो,गमतीचा भाग सोडला तर भोवरा म्हणजे गोलाकार, चक्राकार वस्तू हा सहज निष्कर्ष यातून निघतो.
हे सगळे भोवरे निसर्गाचे, शरीराचे,खेळातले आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले असले तरीसुद्धा भोवरा म्हणजे लहानपणीचा मस्त सवंगडी हे घट्ट समीकरण मनात पूर्णतः ठासून भरलं आहे.
ह्या भोवऱ्याचे दिवस आठवले की आयुष्यही आपलं कस भोवऱ्यासारखच आहे हे प्रत्कर्षाने जाणवायला लागते. जन्मभर सारेच आपले आयुष्य गर-गर करीत फिरत असते,संसाररूपी "जाळी "जीवनाच्या अपरिहार्यतेची "आरू "त्याला सहज फिरवत असते. योग्य ठिकाणी जाळी नीट बसली व नियतीचा झटका योग्य तो आपल्यादिशेने सहज पडला कि आयुष्याचा भोवरा मस्त फिरत राहतो,कुठलीही आडकाठी न येता त्याला नाजुकश्या तळहातावर सहजरित्या पेलता येत!पराभवाच्या प्रसंगातही "गुच्ची" कितीही बसल्या तरी परत नव्या उमीदीने आयुष्याचा खेळ हसत -हसत पुढे नेता येतो. हाच भोवरा "आरु "वर करून फिरला कि आयुष्यही असच फरफटत -फरफटत फिरत जाते हे नक्की याच करिता आयुष्याचा हा भोवरा असाच अलगद ,चलाख पद्धतीने ,योग्यरीत्या फिरवता. आला पाहिजे तरच जीवनाचे सार्थक होईल हाच संदेश फिरणारा "भोवरा"देत असतो.
170520 - मोहरा




१.नंतर आयुष्यतील वादळात असे अनेक भोवरे अनुभवायला मिळाले पण त्याच्या जाळीचा कंट्रोल आपल्या हातात असल्यामुळे कि काय त्या कुठल्याच भोवऱ्यात न अडकता आयुष्याची वाटचाल सुरु आहे.
उत्तर द्याहटवा*हेच तर महत्त्वाचे आहे*
२. खेळाडूला कुठलीच शिक्षा न देता,त्याच्या वस्तूला देणं हे खिलाडूवृत्तीची व औदार्याची जाणीव करून देणारी तेवढीच महत्वाची !
*very important*
३. आयुष्याची "आरू "व्यस्थित असेल तर हा भोवरा योग्यरीत्या जाळीच्या साह्याने फिरत राहणार जर जाळी योग्यरीत्या न बसवता ,भोवरा फिरवला तर तो आरुवर न फिरता तसाच आडवा फिरतो अशीच आपल्या आयुष्याची फटफजिती झाल्यावर बघायला तत्पर समाजमन टपलेलेच असते!
*एकदम सही*
४. थोडक्यात काय तर निसर्गाच्या भोवऱ्यात आपण कधी अडकू नये तो आपली दुर्दशाच करतो,तसच कुठ्ल्याच मोहरूपी भोवऱ्यापासून न अडकता आयुष्याची वाटचाल करावी हाच बोध निसर्गाकडून आपण शिकला पाहीजे .
*हीच खरी अध्यात्मिक साधना आहे.*