माझी अल्टोगिरी ...... अर्थात चारचाकी-री
050520. —“मोहरा”
-

******************************************************************************************************************************************************************
आमची पिढी म्हणजे ६० ते ७०या दशकात जन्म घेतलेली ,तशी खुपशी भाग्यवानच !जगातील बदल सहज पचवत त्याच्याशी पूर्णतः एकरूप होत साठीकडे वाटचाल करणारी,आजची सगळी भौतिक सुख एका विशिष्ट वयात आत्मसात करून ती आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवणारी नशीबवान पिढीच !काम्पुटर ,मोबाइल,इंटरनेट चार चाकी ,विमानप्रवास ,परदेशगमन अश्या सगळ्या क्षेत्रात स्वतःला काळानुरूप ठेवणारी किंबहुना त्याच्याशी समरस होत आचरण करणारी. हे सगळे विचित्र पण हवेहवेसे वाटणारे बदल सहज जगताना अनेक कठीण व गमतीदार प्रसंगाला समोर जावे लागले पण "कोशिश करने वालो कि हार नही होती"या प्रमाणे या सगळ्या पारिस्थितीवर मात करून समर्थपणे नवीन पिढीच्या पावलावर पाऊल टाकून आज आम्ही उभे आहोत हे निर्विवाद सत्य मान्य करावेच लागेल.
आम्ही,बालपणी सायकल धडपडत शिकून मोठं होईपर्यंत तिची साथ न सोडणारे, कॉलेज जीवनात असताना "लुना" नामक सायकलचा पेट्रो अवतार फिरवताना कधी स्कुटरकडे वळलो हे कळलंच नाही .बजाज ,व्हेस्पा करीत ऐन उमेदीचा काळ मोटारसायकलचे पायातले गियर जीवनाच्या गियर प्रमाणे सहज बदलवू लागलो,हे सर्व करीत असताना कधी चाळीशीत पोहचलो हे आमचा वाढदिवस साजरा करीत असतानाच कळते झाले.
अश्यातच ,वाहन क्षेत्रात सुद्धा क्रांतीचे वारे वाहायला सुरवात झाली होती,श्रीमंत-घरंदाज लोकांच्या घरात दिसणारी अँबेसेडर,पद्मिनी इत्यादीची जागा नवीन नवीन चार चाकी घेऊ लागल्या होत्या.जागतिकारणाच्या या विळख्यात अनेक देशी,परदेशी चार चाकी गाड्यांचे पेव जोरात फुटले होत.प्रतिष्ठेची स्कुटर बाळगणारा मध्यमवर्ग यात सहज ओढल्या गेला आणि बघता बघता कार सहजरित्या बाळगू लागला.
एव्हाना,केंद्र सरकारने आम्हाला नवीन पे कमिशन लागू केले त्यामुळे आर्थिक पातळीवर अस्मादिकांना आपण खूप काही कमाऊ लागलो याची उगाचच आकडे पाहून जाणीव होऊ लागली,अर्थात महागाई आणि पगार यांची सांगड जन्मसावित्री सारखी नेहमीप्रमाणेच मेळ घालत नव्हती ,पण कुठेतरी मासिक हप्ते सहज भरू शकतो याचाही विश्वास कुठेतरी जाणवत होता.मुलं मोठी होत होती ,लग्नकार्य-प्रसंगानुरुप बाहेर जाण्यासाठी दोन दुचाकी न्याव्या लागू लागल्या,त्यातही पाऊस ,ऊन ,थंडी मध्ये शालू-शेले नेसून कस जायचं?हा माझ्यापेक्षा कुटुंबाला पडलेला गहन प्रश्न!
आम्ही आफिसमध्ये,आणि घरी ,यांची याच विषयावर गंभीर खलबत,चर्चा घडू लागल्या,त्याचे थोडेफार पडसाद , पाऊसच आहे, थंडी खूप आहे ,आम्ही नाही येत ,तुम्हीच जा ....... इत्यादी स्वरूपात गंभीरपणे दिसू लागले होते पण माझ्यासारख्यां सुज्ञाने त्याच्याकडे कानाडोळा करीत आपला मार्ग आक्रमित ठेवायचाच असा दृढ निश्चय केला होता.
पण, शेवटी याचा व्हायचा तो स्फोट अपेक्षेप्रमाणे एकदा आफिसमधून आल्यावर माझ्या आवडीची डिश भेळ आणि चहा दिल्यानंतर सौ ने केलाच.... अहो,(ती तशी अरे कारे करते ..... प्रेमविवाहाची फलश्रुती !)ऐकलंत का,मी काय म्हणते? (या एका वाक्यातच समस्त नवरे मंडळी पुढे काहीतरी संकट नक्की येणार म्हणून कानाडोळा करतात )आपण एक छोटीशी कार घ्यायची का? माझ्या पोटात भयानक गोळा! पण आवडीचा पदार्थ मिळाल्यामुळे मी मूग गिळून शांत! कशीतरी सुटका व्हावी म्हणून, हं! म्हणटले आणि वर्तमानपत्रात उगाचच डोकं खुपसून बसलो.पण सरदाराला हे काही मान्य नव्हतं ,दिमतीला मुलगा,मुलगी आदी फौजफाटा जमा झाला आणि सगळे मिळून अक्षरशः एखाद्या आरोपीला ठाणेदार, फोजदार,शिपाई एकावर एक प्रश्न विचारून बेजार करतात त्याप्रमाणे तुटून पडले. त्यातही आमच्या सौ चे अर्थशास्त्र उत्तम! मी कशी काटकसर करते,किती पैसा वाचवते, दोन दुचाकी वापरून आपण किती नुकसान सहन करतो हे उदाहरणासहित पटवून देऊ लागली.चार चाकी घेणं कसे प्रतिष्ठीचे आहे,आपली पत काय आहे, सगळ्यांकडे असते इ.मुक्ताफळे ऐकवून मुलगीही खंबीरपणे किल्ला लढवू लागली,एरवी शांत बसणारे चिरंजिव बाबा ,तुमच्यात न डेअरिंगचं नाही आहे,तुम्हाला गाडी चालवायची भीती वाटते, सगळी दुनिया बघा कशी समोर समोर जाते आहे आणि तुम्ही... असे ठेवणीतले बाण पटापट सोडून मला घायाळ करू लागला , ह्या सगळ्यांचा मार असाह्य वाटू लागला नवरा ह्या प्राणिमात्राची विशेषणे (हतबल,आज्ञाकारी,घरच्यांचं ऐकणारा,ताटाखालचं मांजर ,नवरा माझ्या मुठीत इ ... )गृहीत धरूनच कुठलीही आयुधे युद्धाचा सामना करूच शकत नसल्याने तहाचा निर्णय घेण्याचा समजूतदारपणा मला दाखवावाच लागला. काय करणार जिथे पर्याय संपतात तिथे तडजोड आवश्यक असते हीच तर सुखी संसाराची गुरूकिल्ली असते,अशी आमची भाबडी समजूत. असो, कार तर घ्यायची ठरली,एवढे नक्की झाल्यावर चर्चेच्या फैरीवर फैरी झडू लागल्या, कंपनी, साइज, रंग-रूप या बाबतीत वाद-प्रतिवाद होऊ लागलेत मी मात्र अर्थकारणाच्या विवंचनेत बँकेत चकरा मारू लागलो,कुठे व्याज कमी,कुठे कागदपत्र कमी याची चौकशी करित सर्वानुमते नाहीच पण आपला "व्हेटो" वापरूनच मी आपल्या आवाक्यातील मारुतीची अल्टो कार घेण्याचे धाडस पूर्ण करण्याचे ठरवले. अस्मादिकांचे नातेवाईक ,मित्रमंडळ यांचे बहुमोल अनुभव या कामी नक्कीच सार्थकी लागले.
ह्या सगळ्या घडामोडीच्या आधी पुढे घडणाऱ्या बाका प्रसंगाची चाहूल असल्यामुळेच कि काय चार चाकी चालवण्यासाठीचा आवश्यक असणारा परवाना नागपुरातील एका प्रतिष्ठित मोटार ड्रायव्हिंग स्कुल च्या मार्फत काढायचा ठरवले,
आफिसमधून आल्यावर ४५ मिनटे रोज शिकाऊ गाडीवर सराव करायला सुरवात केली, बाजूला इंस्ट्रुक्टर आणि पूर्ण कंट्रोल त्याच्या पायात मग काय गाडी चालवणं किती सोपं असत अशी उगाचच डोक्यात हवा घुसली , आणि मला दोन दिवसातच गाडी आली अशी फुशारकी मारू लागलो, जे अनुभवी होते ते कुठेतरी गालातल्यागालात हसत होते हे नंतरच कळले! असो, मग तो परवाना काढायचा दिवस उगवला बाजूला इंस्ट्रुक्टर,त्याचीच गाडी आम्ही फक्त स्टिअरिंग घट्ट पकडून बसलो.(तेव्हा इंस्ट्रुक्टर व त्याची गाडी चालत असे ) झोकात चढ-उतार,आठचा आकडा वगैरे काढून विथ बुक्स परीक्षा पास झालो. दहा दिवसांनी घरपोच परवाना हातात पडल्यावर खूप मोठी अचिव्हमेंट केल्याचा फील उगाचच येत राहिला,आणि मी कायदेशीर परवानाधारक झालो.
यानंतरची पुढची पायरी गाठायचं ठरवलं, नामांकित कार कंपनीच्या शोरूम मध्ये (ज्या नेहमी गावाच्या बाहेरच का असतात ?हे एक न सुटलेलं कोड!)जाऊन पोहचलो. या कंपन्यांमध्ये तरुण मुली गरज नसताना तोकडे कपडे घालत,आंग्लाळलेले वाक्य फेकत आम्हाला या बसा करीत ,आलिशान सोफ्यात विराजमान करित्या झाल्या. शुद्ध जल,चहा कि काफी करत आमची वास्तपुत करू लागल्या!मला तर कुठली मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात सुद्धा असे स्वागत ,अगत्य नसेल राहत असे उगाचच वाटू लागले आणि आपण याचा अनुभव घेऊ शकलो नाही म्हणून मन कुठेतरी उगाचच खाट्टु पण झाले. त्या सुंदर -सुंदर मुलींशी जास्त बोलायची पण काही सोय नव्हती,कारण घरचा सीसी टीव्ही कॅमेरा सतत लक्ष ठेवूनच होता.
स्वतःला सेल्सएक्सुकेटीव्ह म्हणवऱ्यानी मग आमचा ताबा घेतला,शर्टाला" टाय"नामक शेपूट लावणारे गाडीचे माहितीपत्रक -कागद-पेनासहीत घेऊन आम्हाला काचेच्या गोल टेबलावर स्थानापन्न करून हा कसा आपल्या गळात फसला पाहिजे या दृष्टीने आमची कौटुंबिक, आर्थिक,सामाजिक ,व नोकरीची माहिती गोळा करू लागला व तुम्हाला अमुकच कार कशी फायदेशीर आहे हे पटवून देऊ लागला ,सोबतच कारचे डिटेल्स सांगून तुम्ही किती योग्य ठिकाणी आलात म्हणून आश्वस्त करू लागला.
मीही सराईताप्रमाणे (अर्थात ऐकीव माहितीवर )गाडीचं इंजिन ,कपॅसिटी ,ऍव्हरेज यावर आपले नसलेलं ज्ञान पाजळत मी पण माहितीगार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न अयशस्वी का होईना पण करू लागलो ,माझे हे अगाध ज्ञान बायको मात्र कौतुकाने बघत होती,त्या बापडीला काय माहिती कि आपला नवरा खरच किती ज्ञानी आहे ते .....!शेवटी माझ्या पहिल्या नावासमोर" सर"लावण्याइतपत त्याने माझ्याशी कधी सलगी केली आणि मी त्याच्या जाळ्यात कसा अलगद अडकलो हे मलाही कळले नाही,पण आमचं अल्टो कार घेण्याचे नक्की करण्यात मात्र तो कमालीचा यशस्वी झाला एवढं नक्की!
नवीन गाडीत बसून बघा ,त्याची विविधता बघा,मागच्या सीटवर बसून बघा, स्टिअरिंग धरा असे सर्व सोपस्कार पार पाडून तुम्ही आता टेस्ट-ड्राइव्ह घ्या असं म्हणताच माझी विकेट तिथेच उडाली!मोठा बाका प्रसंग आणला त्याने.... कारण मला गाडी चालवता येईल याचा विश्वासच नव्हता काहीतरी थातुर-मातुर कारण सांगून वेळ मात्र निभावून नेली. पुढील ८-१०दिवसांनी आमच्या बंधुराजांना घेऊन शोरूम गाठले ,गाडीच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर आणि मुख्य म्हणजे संपूर्ण रकमेचा चेक दिल्यावरच भली मोठी कागदी पुठ्याची किल्ली घेऊन गाडीसमोर सर्व कुटुंबाला उभं करून फोटो काढण्याचा सोहळा संपन्न झाला आणि एक छानसा फोटो ज्यात सौ चे निर्व्याज हसू आणि माझे बळेबळेच हसू व कारचे वाकुल्या दाखवणारे रूप सहज लक्षात येत होते. तज्ञ बंधूराजाच्या मदतीने मग सजवलेल्या गाडीसकट आमची वरात घराच्या पार्किंग मध्ये दाखल झाली ,नवीन गाडी आली म्हणून शेजारी कुतूहलाने, काही असूयेने गोळा झालेत आणि नको असलेले फुकटचे सल्ले देऊ लागलेत, नेहमीप्रमाणे हार-फुल-पेढे सोपस्कार पूर्ण करून पेढे खाल्ल्यावरच शेजारी पांगलेत,अशातऱ्हेने आम्ही कार मालक -चालक झालो .........!
शनिवार -रविवार सराव म्हणून गाडी चालवणे सुरु केले अर्थातच बाजूला एखादा सराईत बसवूनच!गाडी चालवण्याचा कायम परवाना असूनही कुठेतरी लोकांनी आपल्यापासून वाचावं व आपणही त्यांना वाचवाव म्हणून मागे पुढे मोठठा "एल"चा बोर्ड लावून गाडी चालवू लागलो.....,पहिले ग्राउंड ,मग काॅलनितले रस्ते ,नंतर चौक अशी एक एक प्रगतीची पायरी चढू लागलो. सिग्नलपाशी गाडी उभी केल्यावर ग्रीन सिग्नल नंतर गाडी समोर काढता न आल्यामुळे लोकांचे यथेच्य शिव्या-शाप बंद काचेतुनही सहज कानावर पडू लागलेत पण आपण बेशरम बनायचे हे मित्राचा सल्ला कायम मनात ठेवत माझी कारगिरी चालूच ठेवली. गाडी शिकत असताना बरेच दिवस "बेटिंग पॉइंट "ह्या भयानक शब्दाने खुपच छळले ,आयुष्यात नाही जेवढे चढ-उतार पहिले तेवढे अख्ख्या पश्चिम नागपुरातले अनेक चढ-उतार या बेटिंग- पाॅइंट करिता पालथे घातले पण आता सरावाने त्यावर नक्कीच मात केली आहे .
गिअर टाकणे ,क्लच -ब्रेक यांच्या मिलाफाचे तंत्रज्ञान हळू-हळू करता उमगू लागले व माझी गाडी व्यवस्थित रस्त्यावरून धावू लागली. पण अजूनही जॅक लावायला व बॉनेट उघडायला हिम्मत काही आली नाही. नागपुरात चालवत असताना गाडीला पाचवा गिअर असतो हेच विस्मृतीत गेलं होतं पण आफिसकामानिमित्त परगावी (तेही ५०-६० किलोमीटरच्या आतच)जाताना एक दोनदा प्रयत्न केला थोडं सुरवातीला नागपुरी भाषेत खाट-खुट झालं पण तेही जमलं .
गाडी चालवण्याच्या बाबतीत आमच्या सौ चे गणित एकदम पक्के, नेहमी सूचनांचा सतत भडीमार असतो ब्रेक ऐवजी आमची स्पीड तशीच कमी करणे,कशी गाडी चालवायची,कोणत्या गिअर मध्ये चालवायची १०-२०,२०-३०,३०-४० स्पीड मध्ये कोणता गिअर वापरायचा याचे सखोल ज्ञान तिला भरपूर आहे आणि बाजूला बसून मी अजूनही नवशिका आणि ती एक्सपर्ट अश्या थाटात आमची सवारी चालत असते तिनेही कायम परवाना काढला आहे पण न चालवण्याचा!मात्र ड्रायव्हिंग क्लास करीत असताना पक्की झालेली थेअरी सतत ऐकवून माझी मात्र उजळणी होते हे हि थोडके नसेना!
खरंच ,आता मागे वळून बघता आश्यर्य वाटते कि काही का असेना आज ह्यांच्याच तर हिमंतीमुळे आपण आज सराईतपणे गाडी चालवू शकतो ,मुलांनी तर कॉलेज जीवनातच उत्तमरीत्या गाडी चालवणे आत्मसात केले आहे त्यांचे वय,हिम्मत म्हणूनच शक्य झालं पण आपण चाळीशी पार केल्यानंतर गाडी शिकून आज या आधुनिक तंत्रप्रवाहात स्वतःला झोकून सामील करून घेतले ह्याचा आत्माभिमान प्रकर्षाने नक्कीच जाणवतो. नव्या युगाचे पाईक आम्ही हि केशवसुतांची कविता आपणही सार्थपणे जगतो आहे हे बघून मन कुठेतरी सुखावत सुद्धा !
आता ७-८ वर्षे झाली ,गाडी जुनी झाली पण अजूनही मालकाप्रती तिचे प्रेम तसूभरही ढळले नाही,बिचारीची कधीच काही तक्रार नाही अगदी पहिल्या प्रेमागत आम्ही दोघेही एकमेकांवर तेवढेच प्रेम करतो पण आता काळ बदलला आहे,आपणही आता कुठेतरी बदललं पाहिजे असं सतत मन बजावत असते पण धजवत नाही ,मनात कुठेतरी असंख्य भावना उचंबळून येतात,दाटून येतात.
गाडीवरील धूळ साफ करीत असताना सहज मनात येत ,आपल्या मनातील स्मृतिपटलावरची धूळ इतक्या सहजपणे नाही पुसता येणार........!त्यावर साचलेली धुळ,जळमट सहज साफ करता आली तर.....,किती बर होईल,मन कस आरश्यासारख स्वच्छ होईल......हे शेवटी फक्त जर... तर.... पण काही पर्याय नाही ,शेवटी कालाय तस्मैनम:!
हेच चिरंतन सत्य !
050520. —“मोहरा”
-

******************************************************************************************************************************************************************

खूप सुंदर वर्णन केलंय
उत्तर द्याहटवा